सध्या सेलिब्रिटींना फिट राहण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि त्यासाठी सेलिब्रिटींना पर्सनल ट्रेनर किंवा फिटनेस ट्रेनरची गरज लागते. असाच एक फिटनेस ट्रेनर आहे जो मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रणीत शिलीमकर असं त्याचं नाव आहे आणि वयाच्या 18 व्या वर्षापासून तो फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय. सध्या बऱ्याच मराठी सेलिब्रिटींना प्रणीत फिटनेस ट्रेनिंग देतो. प्रणीतचं ‘37 days challenge’ ट्रेनिंग खुप चर्चेत आहे. आत्तापर्यंत 70 सेलिब्रिटींना प्रणीतने ट्रेन केलय.
प्रणीतने ट्रेन केलेल्या सेलिब्रिटींपैकी रिंकू राजगुरु, भूषण प्रधान, सिध्दार्थ चांदेकर, गायत्री दातार, स्वप्निल जोशी, गौरी नलावडे, संस्कृती बालगुडे, नंदीता धुरी या आणि इतर बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे.
प्रणीतने नुकतच पिपींगमून मराठीला मुलाखत दिलीय. यावेळी त्याने त्याच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. प्रणीत म्हटला की, “ ज्या कलाकारांना मी ट्रेन करतो त्या सगळ्यांशी मैत्रीचं नातं आहे. सिद्धार्थ चांदेकर, भार्गवी यांच्याशी चांगली मैत्री आहे. स्वप्निल दादा माझ्यासाठी एक मेंटर आहे. या कलाकारांपैकी 80 टक्के कलाकार 37 डेज चॅलेंच करतात आणि इतर हे फक्त फिटनेससाठी माझ्याकडे ट्रेन होतात.”
प्रणीत त्याच्या लुक्ससाठीही चर्चेत आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटो पाहून एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्याचं प्रोफाईल असल्यासारखं जाणवेल. याविषयी प्रणीत म्हणतो की, “मला मॉडेल शूटसाठी ऑफऱ येत असतात. युट्यूब चॅनेल्स, वेब सिरीजसाठी पण विचारलं गेलं होतं. पण फिटनेसशी निगडीत प्रोजेक्ट्सचा भाग व्हायला मला आवडेल.”
प्रणीतने त्याच्या 37 डेज चॅलेंजविषयीही सविस्तर सांगीतलं, “37 डेज चॅलेंजमध्ये मी कलाकारांसोबत ट्रेनिंग व्यतिरिक्त सतत संपर्कात असतो. ते काय खात असतात याचे फोटो मी त्यांच्याकडून मागवून घेत असतो. प्रत्येक महिन्यात दोन ते तीन सेलिब्रिटींना मी ट्रेन करतो. 24 तास त्यांच्या संपर्कात असणं त्यांना ट्रेन करणे या गोष्टी यात असतात. 37 दिवसांनंतर माझी टीम त्यांच्या संपर्कात असते.”
प्रणीतच्या विश लिस्टमध्ये प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या कलाकारांचीही नावं आहेत. या कलाकारांना ट्रेन करण्याची प्रणीतची ईच्छा असल्याचं त्याने सांगीतलं.
लवकरच बॉलिवुड कलाकारांनाही प्रणीत ट्रेन करणार असल्याचंही तो सांगतो.
सेलिब्रिटींना ट्रेन करण्याआधी प्रणीत काही वर्षे खेळाडू, मॉडेल्स, एथलिट्सना ट्रेनिंग द्यायचा. प्रणीतला ‘रेप्स लेव्हल 3’चं प्रमाणपत्र मिळालं असून याच्या आधारावर तो भारताबाहेर फिटनेस ट्रेनिंग देऊ शकतो.