By  
on  

करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है'ला २० वर्ष पूर्ण, आजही प्रेक्षकांना पडते भुरळ

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या स्टार्सच्या अभिनयाने सजलेला व रोमॅण्टीक ड्रामाने भरपूर ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज 16 ऑक्टोबर रोजी तब्बल 20 वर्ष पूर्ण होत आहेत. दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेकारकिर्दीत हा सिनेमा मैलाचा दगड ठरला. ‘कुछ कुछ होता है’तील गाणी असोत, दृश्य असोत, संवाद किंवा या सर्व स्टारकास्टची फॅशन असो या सिनेमाने संपूर्ण तरुणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. हा सिनेमा कोण कितीवेळा पाहू शकतं, याचीही जबरदस्त चढाओढ सुरु असायची. या सिनेमातील प्रत्येक गोष्टीने सिनेरसिकांवर आजही गारुड केलं आहे. शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या तिघांचीही अप्रतिम केमेस्ट्री प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळाली. त्यांनी साकारलेल्या राहुल, अंजली आणि टिना या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांमध्ये जिवंत आहेत. फक्त याच नाहीत तर छोटी अंजली साकारणारी सना सईद, अनुपम खेर यांनी रंगवलेले कॉलेज प्रिन्सीपल, प्रोफेसर मिस ब्रिगॅन्झा, राहुलची आई फरिदा जलाल तर अंजलीची आई साकारणा-या रिमा लागू या सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत आलेला सलमान खान या सिनेमात भाव खाऊन गेला. ‘राहुल अंजली का झगडा....’ किंवा काजोलचे 'कुछ कुछ होता है... राहुल तुम नही समझोगे' हे डायलॉग तर अतिशय  लोकप्रिय झाले होते. हा सिनेमा केवळ 10 कोटी रुपयांमध्ये बनला होता. मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा व्यवसाय केला होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाचा रेकॉर्ड 'कुछ कुछ होता है’ने मोडला. महत्त्वाचं म्हणजे करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है सिनेमाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धर्मा प्रोडक्शनने आज एका शानदार इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी खास शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल उपस्थित राहून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या सिनेमाच्या आठवणी जागवतील. काही दिवसांपूर्वीच करण जोहरला 'इश्क एफ एम' या रेडिओ स्टेशनवरून 'कॉलिंग करण' या रेडिओ कार्यक्रमात एका चाहत्याने विचारले होते, की जर 'कुछ कुछ होता है'चा रिमेक बनवायचा झाला, तर त्यात कोणते कलाकार पाहायला मिळतील. यावर करणने रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांचे नाव घेतले होते. पण अद्याप तरी या विषयावर करण काहीच बोलायला तयार नाही. आजच्या ग्रॅंड इव्हेंटकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे, या सिनेमाच्या रिमेकची या इव्हेंटमध्ये घोषणा होण्याची शक्यता असल्याने चाहते आता त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.    

Author

Recommended

PeepingMoon Exclusive