'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. सरताज आणि गणेश गायतोंडेंची आगळीवेगळी थरारक कहाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. विक्रम चंद्रा यांच्या पुस्तकावर आधारित या वेबसिरीजचा पुढच्या भागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाचा प्रोमो अलीकडेच प्रदर्शित झाला. या प्रोमोचं प्रेक्षकांनी दिलखुलास स्वागत केलं.
परंतु 'सेक्रेड गेम्स'च्या चाहत्यांना दुसऱ्या भागाची अजून थोडी वाट पाहायला लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा भाग २८ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु आता 'सेक्रेड गेम्स 2' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून ऑगस्टच्या महिन्यात 'सेक्रेड गेम्स 2' प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी याबाबतीत दोन कारणं सांगितली आहेत. नवाझुद्दीन आणि सैफ अली खान हे दोघेही कलाकार अन्य प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या तारखांची जुळवाजुळव करण्यास अडचणी येत आहेत. तसेच अलीकडेच 'नेटफ्लिक्स'वर 'लीला' ही हिंदी वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे 'सेक्रेड गेम्स'च्या निर्मात्यांना या दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये अंतर हवं आहे.एकूणच 'सेक्रेड गेम्स 2' साठी प्रेक्षकांना अजून थोडी कळ सोसावी लागणार आहे.
या सिनेमातील दोन मुख्य कलाकार अर्थात सैफ आणि नवाझुद्दीन आपल्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सैफ सध्या आपल्या 'जवानी जानेमन' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर नवाझुद्दीन 'बोले चूड़ियां' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे.