MOVIE REVIEW: शाहरुख-आर्यनच्या आवाजातला 'द लायन किंग' पाहणं एक पर्वणी

By  
on  

उत्तम ॲनिमेशन आणि तांत्रिक बाजूंनी सर्वोत्तम असा 'द लायन किंग' बॉक्स ऑफिस वर आला आहे. या सिनेमाचं कथानक लहान मुलांना आवडणार असलं तरी सर्व वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा एन्जॉय करतील. हा सिनेमा तांत्रिक बाबतीत इतका सक्षम झाला आहे की दोन तास प्रेक्षक या अनोख्या दुनियेत हरवून जातील. हा सिनेमा आवर्जून बघण्याचं एकमेव कारण म्हणजे या सिनेमाचं हिंदी वर्जन. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांच्यासह अनेक नामांकित अभिनेत्यांनी या सिनेमाच्या हिंदी वर्जनला आपला आवाज दिला आहे.

 

 

हा सिनेमा मुफासा आणि सिंबा या वडील-मुलामधली एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. मुफासाच्या(शाहरुख खान) व्यक्तिरेखेपासून सिनेमाची सुरुवात होते. मुफासा हा सिंबा(आर्यन खान)सोबत राहत असतो. मुफासा हा जंगलचा राजा असतो. परंतु त्याचं हेच राजेपदाचं सिंहासन जंगलामधील खलनायक प्रवृत्तीचा स्कार(आशीष विद्यार्थी) याला बळकवायचं आहे. त्यामुळे स्कार एक असा डावपेच आखतो ज्यामध्ये मुफासाचा मृत्यु होतो. त्यानंतर स्कार सिंबाला आपल्या वडिलांच्या अर्थात मुफासाच्या मृत्यूची कथा अशी सांगतो जेणेकरून सिंबाला वाटतं की आपल्या वडिलांचा मृत्यूला आपणच कारणीभुत आहोत. त्यानंतर तो पळून जातो. मग पुढे सिम्बा पुन्हा येतो का? त्याला मुफासाच्या मृत्युचं गुढ कळतं का? याची कहाणी प्रेक्षकांना 'द लायन किंग' मधून पाहायला मिळेल. 

हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास पूर्ण यशस्वी होतो. इमोशन,ॲक्शन, कॉमेडी आधी सर्व भावनांचं मिश्रण या सिनेमात पाहायला मिळतं. या सिनेमाची मुख्य जमेची बाजू म्हणजे येथील व्यक्तिरेखांना असणारा कुठलाही आवाज नकली न वाटता त्या त्या व्यक्तिरेखेला समर्पक असा वाटतो. त्यामुळे सिनेमामध्ये खरेपणा आलेला आहे आणि आपण व्यक्तिरेखांची लगेच जोडून घेतो.

सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखा मुफासाला शाहरुख खान ने दिलेला आवाज फक्त अनुभवण्यासारखा आहे. शाहरूख खानने आपल्या दमदार आवाजाचा वापर करत मुफासा हे पात्र मोठ्या पडद्यावर जिवंत केलं आहे. तसेच सिम्बा या व्यक्तिरेखेला आर्यन खान याने दिलेला आवाज सुद्धा तितकाच दमदार वाटतो. शाहरुख खान च्या तुलनेत आर्यनचा आवाज काही ठिकाणी थोडा कमजोर वाटत असला तरी या पिता-पुत्रांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. शाहरुख खानने मुलगा आर्यनचं अभिनयाऐवजी डबिंगच्या स्वरुपात केलेलं पदार्पण कौतुकास्पद आहे. 

त्याचबरोबर अन्य व्यक्तिरेखांचा सिनेमातला प्रवेश अत्यंत योग्य जागांवर होतो आणि खुप सा-या व्यक्तिरेखा असल्या तरी प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहते. स्कार या खलनायकाच्या रुपात अशिष विद्यार्थी यांनी कठोर आवाजाचा केलेला वापर दाद देण्याजोगा. तसेच संजय मिश्रा यांनी पुंबाच्या व्यक्तिरेखेसाठी बिहारी टोनचा केलेला वापर आणि श्रेयस तळपदे याने टिमाॅनसाठी रैपरच्या आवाजाचा केलेला वापर कमाल आहे. टिमाॅन आणि पुम्बा या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप हसवते. 

2 तासाचा असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. खुप प्रसंगात प्रेक्षक खळखळुन हसतात तर काही प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळ्यातुन पाणी येतं. अॅनिमेशनपटाचा इतका जीवंतपणा अनुभवणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. याचं सर्व श्रेय या सिनेमाच्या दिग्दर्शकांना आणि या सिनेमाशी संबंधित सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना जातं. ज्यांनी 1994 साली आलेला 'द लायन किंग' हा कार्टुन सिनेमा पाहिला आहे त्यांना पुनःप्रत्ययाचा रंजक अनुभव मिळेल. आणि ज्यांनी काहीच पाहीला नाही त्यांच्यासाठी शाहरुख-आर्यनच्या आवाजातला हा 'लायन किंग' पाहणं एक पर्वणी असणार आहे.

Recommended

Loading...
Share