Birthday Special: अमिताभ बच्चन यांच्या नावामागचा हा मजेदार किस्सा जाणून घ्या

By  
on  

बाॅलिवुडमध्ये गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी यांचा आज वाढदिवस. कधी 'अग्निपथ' मधील विजय दिनानाथ चौहान, कधी 'पिकु' मधील खवचट तरीही प्रेमळ बाप, कधी 'पा' मधील मस्तीखोर ऑरो, तर कधी 'पिंक' मधील करारी वकील इ. बच्चन यांच्या अनेक आणि विविध भुमिका आजही रसिकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. पण सर्वांना माहीत असणारे बिग बी आज 'अमिताभ बच्चन' या नावाने नसते तर...

अमिताभ बच्चन यांचा जन्म एका नर्सिंग होम मध्ये झाला. अमिताभ बच्चन यांचे वडील कवी हरीवंशराय बच्चन यांचा मित्रमंडळींचा खुप गोतावळा होता. अमिताभ यांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या वडिलांचे मित्र कवी सुमित्रानंदन पंत या छोट्या बाळाला बघायला आले. 

सुमित्रानंदन यांनी अमिताभ यांना नीट न्याहाळले. तेव्हा ते म्हणाले. 'एका ध्यानस्थ अमिताभ सारखा हा बाळ किती शांत वाटत आहे'. सुमित्रानंदन यांची ही गोष्ट अमिताभ यांचे वडिल आणि आईने पटकन हेरली. आणि त्याचक्षणी बाळाचं नाव 'अमिताभ' हे नक्की झालं. 'असामान्य प्रतिभा असलेला' असा 'अमिताभ'चा अर्थ होतो. 

अमिताभ यांच्या जन्माच्या वेळेस भारतात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरु लागली होती. त्यावेळेस होणा-या बाळाचं नाव 'इन्कलाब' असं ठेवावं असा सल्ला हरिवंशराय यांचे मित्र क्रांतीकारक अमरनाथ झा यांनी दिला होता. त्यामुळे आज कदाचित अमिताभ बच्चन यांचं नाव वेगळं असलं असतं. 

पण अमिताभ बच्चन हे नाव आणि हा माणुस आजही अफाट वेगाने काम करत बाॅलिवुड, हाॅलिवुड आणि इतर भाषांमध्ये स्वतःच्या अभिनयाची जादु पसरवत आहे. या अभिनय सम्राटास पिपिंगमून मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Recommended

Loading...
Share