By  
on  

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.  अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून निशिकांत यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या निधनाची बातमी समोर आणली आहे. शिवाय ते उपचार घेत असलेल्या रुग्णालयानेही स्टेटमेंट जारी करुन याविषयीची माहिती दिली आहे.

निशिकांत कामत यांना जुलै महिन्यात कावीळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना क्रॉनिक लिव्हर डिसीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं समोर आलं होतं. यकृताच्या आजाराने ते त्रस्त होते आणि मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज संपली आणि त्यांनी उपचार सुरु असलेल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

 

 

निशिकांत कामत यांनी अनेक उत्तमोत्तम मराठी आणि हिंदी सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. 'डोंबिवली फास्ट', 'लय भारी', 'मदारी', 'दृश्यम' या त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'डोंबिवली फास्ट' या त्यांच्या मराठी सिनेमाला 2006मध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. 'हवा आने दे', 'सातच्या आत घरात', 'रॉकी हँडसम', 'फुगे', 'डॅडी', 'जुली 2', 'भावेश जोशी' या  सिनेमात त्यांनी भूमिकाही साकारल्या होत्या.ते कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतील.  

निशिकांत कामत यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मिडीयावर अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive