By  
on  

नव्या वर्षात या मालिका करणार प्रेक्षकांचं मनोरंजन, झळकणार हे प्रसिद्ध कलाकार

नव्या वर्षाचं सेलिब्रेशन होत असताना आता मनोरंजनसाठी टेलिव्हिजनवर काय पाहता येईल यासाठी टेलिव्हिजनचा प्रेक्षक उत्सुक आहे. यातच काही नव्याकोऱ्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. यातच मागील वर्ष संपत असताना काही नव्या मालिकांनी टेलिव्हिजनवर एन्ट्री केली तर काही नव्याकोऱ्या मालिका 2021 या नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

सून सासू सून 
रिएलिटी शोच्या गर्दीत प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येण्यासाठी ‘सून सासू सून’ हा नवा कार्यक्रम येत आहे. टेलिव्हिजनवर सासू-सूनेच्या नात्यावर अनेक मालिका आहेत, मात्र या कार्यक्रमातून सासू सूनेच्या खऱ्या आयुष्यातील जोड्या पाहायला मिळणार आहेत. सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं आहे. सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर फक्त सुसंवाद असेल. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम म्हणजेच सुत्रसंचालनाचं काम प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री करणार आहे. येत्या 11 जानेवारीपासून हा नवाकोरा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर पाहत येणार आहे. 


येऊ कशी तशी मी नांदायला 
टेलिव्हिजनवर सासू-सूनेच्या नात्यावर मालिका मोठया प्रमाणात पाहिल्या जातात. अशात मिश्किल सासू आणि खट्याळ सूनेची अनोखी धमाल पाहायला मिळणार आहे येऊ कशी तशी मी नांदायला या नव्या मालिकेत. शकु आणि स्वीटूची ही गोष्ट आहे. या दोघी नात्यानं सासू सून असल्या तरी मनानं मैत्रीचं नातं आहे. अभिनेत्री अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर, शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. 4 जानेवारीपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. 
 


 
काय घडलं त्या रात्री ?
‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका 2020 वर्षाच्या शेवटाला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेव्हा नव्या वर्षातही मालिकेचे पुढील भाग पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री मानसी साळवी या मालिकेतून तब्बल 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करतेय. या मालिकेत अभिनेता सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, स्वाती लिमये, किशोर कदम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. झी मराठी वाहिनीवर ही मालिका वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधतेय.

 
तू चांदणे शिंपीत जाशी
 मिसेसे मुख्यमंत्री या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अमृता धोंगडे नव्या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘तू चांदणे शिंपीत जाशी’ असं या मालिकेचं नाव आहे. घर आणि गॅरेज सांभाळून कष्ट करणाऱ्या एका मुलीची ही कहाणी आहे. 2020 च्या शेवटाला या मालिकेला सुरुवात झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही नवी मालिका नुकतीच सुरु झाली आहे.

सख्खे शेजारी
काही नाती ही रक्ताची नसली तरी हक्काची नाती असतात. असचं नात आहे शेजारींचं. ते नेहमी सुख-दु:खात सोबत असता. असचं नातं जपणारे काही सख्खे शेजारी नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीला येणार आहेत. सख्खे शेजारी असं या कार्यक्रमाचं नाव असून अभिनेता चिन्मय उदगीरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. 11 जानेवारीपासून हा नवाकोरा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

जय जय स्वामी समर्थ 
जय जय स्वामी समर्थ ही नवी मालिकाही मागील वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नव्या वर्षातही स्वामी समर्थ भक्त या मालिकेचा आस्वाद घेत हेत. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका 2020च्या डिसेंबर महिन्यात भेटीला आली आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive