By  
on  

 Birthday Special : या वैविध्यपूर्ण भूमिकांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जिंकली प्रेक्षकांची मनं , हे आहेत टॉप 10 चित्रपट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनय कौशल्यातून आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिचं मोहक सौंदर्य, नृत्याची जाण, अभिनय यातून तिने साकारलेल्या अनेक भूमिका या लक्षवेधी ठरल्या आहेत. सोनालीच्या सिनेकारकिर्दीच्या या प्रवासात विविध पात्रांमधून तिच्या अभिनयाच्या विविध छटा पाहायला मिळाल्या. त्यापैकी टॉप 10 भूमिकांचा हा आढावा.
 
बकुळा नामदेव घोटाळे
2007 मध्ये सोनाली कुलकर्णीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात साकारलेली साधी भोळी बकुळा चांगलीच भावली होती. या चित्रपटात सोनालीने अभिनेता भरत जाधव आणि सिध्दार्थ जाधव यांच्यासोबत काम केलं होतं.

नटरंग
रवी जाधव यांच्या लोकप्रिय नटरंग चित्रपटात सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. कलाकारांच्या संचातील नयना नावाच्या लीड नृत्यांगनेची भूमिका तिने या चित्रटात साकारली होती. या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचं गाणं प्रचंड गाजलं आणि पुढे जाऊन या हा चित्रपट तिची ओळख ठरला. 

अजिंठा
नितीन देसाई यांचा हा चित्रपट लोकप्रिय ठरला नसला तरी या चित्रपटातील सोनालीच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. तिचा लुक, मेकअप, नृत्य आणि चित्रपटाच्या विषयाची भरपुर चर्चा झाली. पारो या बौद्ध आदिवासीच्या भूमिकेत सोनाली झळकली होती.


क्लासमेट्स
‘क्लासमेट्स’ सिनेमातील तिच्या निरागस आदितीच्या भूमिकेतूनही तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं. अभिनेता अंकुश चौधरीसोबतची सोनालीची रोमँटीक जोडीही पसंत केली गेली.


मितवा 
अभिनेता स्वप्निल जोशी सोबतची सोनालीची केमिस्ट्री पसंत केली गेली ती मितवा या चित्रपटातून. चित्रपटाची गाणी, कहाणी आणि स्वप्निल-सोनालीची जोडी मुख्य आकर्षण ठरलं.

शटर
सोनालीने तिच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटात अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शटर हा चित्रपट. या चित्रपटात सोनालीने वेश्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. या चित्रपटात सोनाली अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत झळकली.

पोश्टरगर्ल
या चित्रपटात सोनाली प्रमुख भूमिकेत झळकली होती. रुपाली थोरात नावाची मुलगी एका बालहत्येसाठी प्रसिद्ध गावात जाते आणि कसं सगळं बदलून टाकते असा या चित्रपटाचा नाजूक विषय होता. सोनालीने रुपालीच्या भूमिकेतून या कहाणीत जीव ओतला आहे. 

हंपी
या चित्रपटात सोनालीने ईशा ही व्यक्तिरेखा साकारली आहे ज्यात आयुष्यातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी ती हंपी गाठते. पुढे या प्रवासात तिला कोण कोण भेटतं आणि काय गवसतं हे या चित्रपटात पाहायला मिळालय. या चित्रटात सोनाली शॉर्ट हेअरकट असलेल्या हटके लुकमध्ये दिसली. 

हिरकणी 
ज्या व्यक्तिरेखेमुळे सोनालीवर पुरस्कारांचा, कौतुकाचा वर्षाव झाला ती भूमिका म्हणजे हिरकणी. प्रसाद ओक दिग्दर्शित हा चित्रपट सोनालीसाठी टर्निंग पॉईंट ठरला. या भूमिकेसाठी सोनालीवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा जणू वर्षावच झाला. सोनालीने या चित्रपटात हिरकणी ही ऐतिहासिक भूमिका केली आणि प्रेक्षकांनी तिला पसंतीची पावती दिली. 

धुरळा
हा मल्टिस्टारर चित्रपट राजकारण आणि ड्रामावर आधारित होता. सोनाली कुलकर्णीसह या चित्रपटात सिध्दार्थ जाधव, अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अलका कुबल या उत्तम कलाकारांची फळी पाहायला मिळाली. यातही सोनाली तिच्य हटके पात्रामुळे चांगलीच भाव खाऊन गेली. या चित्रपटातील तिच्या पात्रातील वेगळ्या छटा तिने उत्तम सादर केल्या.

Recommended

PeepingMoon Exclusive