सत्तेचा हव्यास मानवी मनाला अनादी कालापासून आहे. पण सत्तेच्या वाटेवर अनेक त्याग करावे लागतात. प्रसंगी आपल्यांविरोधात दंड थोपटून उभं रहावं लागतं. मकरंद माने दिग्दर्शित कागरचं कथानक देखील असंच काहीसं आहे. सैराटनंतर खुप दिवसांनी रिंकू राजगुरु कागरच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे या सिनेमात तिची जादू अनुभवण्यासारखी आहे.
दिग्दर्शक: मकरंद माने
निर्माते : सुधीर कोलते, विकास हांडे
कलाकार: रिंकू राजगुरु, शुभंकर तावडे, शशांक शेंडे
वेळ: 2 तास १० मिनिट
रेटींग : ३ मून
कथानक : या कथेला राजकारणाचं अंग आहे तसंच उमलणा-या प्रेमकथेचीही जोड आहे. गावातील प्रस्थापित आमदार भैय्यासाहेब (शंतनू गंगाणे) यांचे राजकिय गुरु गुरुजी (शशांक शेंडे) यांची मुलगी राणी ( रिंकू राजगुरु) हिचं युवराज (शुभंकर तावडे) या तरुणासोबत प्रेमप्रकरण असतं. युवराज स्वत:ची राजकिय ओळख बनवण्यासाठी धडपडत असतोच. त्याहूनही राणीसोबत भविष्याची स्वप्नंही रंगवत असतो. गुरुजींना राणीला आमदार करायचं असतं. त्यासाठी युवराजच्या रुपात त्यांना मोहरा सापडतो. युवराजच्या भावनेचा फायदा घेत गुरुजी त्याला एका घटनेत अडकवतात. राणीला वडिलांच्या या कारस्थानाचा सुगावा लागतो पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. या सगळ्यात राणी स्वत:ला सिद्ध करते का? सुखी संसाराची स्वप्न रंगवणारी राणी एकाएकी राजकारणाच्या पटलावर कशी हे सिनेमात पाहणं रंजक ठरेल.
दिग्दर्शन : ग्रामीण बाज, राजकारण, व्यक्तीची सत्तालोलुपता पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शक मकरंद माने यशस्वी झाले आहेत. सक्षम स्त्रीपात्र हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहेत. त्याचे वेगवेगळे पैलू रसिकांसमोर आणण्यात मकरंद माने यशस्वी ठरले आहेत.
अभिनय : संपुर्ण सिनेमात भाव खाऊन जाते ती रिंकू. सैराटनंतर ब-याच काळानंतर ती पडद्यावर दिसली आहे. या काळात तिने स्वत:मध्ये कमालीचे बदल केले आहेत. अभिनयातील येत जाणारी परिपक्वता जाणवल्याशिवाय रहात नाही. शशांक शेंडे यांनी पाताळयंत्री गुरुजी ताकदीने साकारले आहेत. सच्चा तळमळीचा कार्यकर्ता, हळवा प्रियकर, अज्ञाधारक शिष्य साकारण्यात युवराज यशस्वी ठरला आहे.
सिनेमा का पहावा? : ग्रामीण राजकारणाची धुंदी अनुभवायची असेल तर हा सिनेमा पहावा. रिंकू आणि शुभंकरची सिझलिंग केमिस्ट्री यात रसिकांना आवडेल यात शंका नाही.