Photo Prem Review : सामान्य प्रसंगाची असामान्य कथा सांगणारा उत्कंठावर्धक प्रवास 

By  
on  

चित्रपट – फोटो प्रेम

कलाकार – नीना कुळकर्णी, अमिता खोपकर, विकास हांडे, चैत्राली रोडे, समीर धर्माधिकारी, समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर, निलकंठ सावंत

दिग्दर्शक – आदित्य राठी, गायत्री पाटील

निर्माते – मेहुल शाह, आदित्य राठी, गायत्री पाटील

लेखक -  आदित्य राठी, गायत्री पाटील 

संगीत – कौशल इनामदार

रेटिंग – 3.5 मून्स

मृत्यूनंतर जग आपल्याला फोटोच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवेल या भावनेचा  वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का? अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला फोटो प्रेम हा चित्रपट मात्र तुम्हाला हे विश्व उलगडून दाखवणारा आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन- दिग्दर्शन केलय. 
ही कथा आहे सुनंदा (नीना कुळकर्णी) म्हणजेच माईंची. माई आणि त्यांचे पति असा त्यांचा संसार आहे. मुलीच्या लग्नानंतर माई या त्यांच्या घरच्या रोजच्या कामांमध्ये रमलेल्या असतात. मात्र एक दिवस पतिच्या मित्राची पत्नी निधन पावते. माई आणि त्यांचे पति त्यांच्या अंत्यविधीला जातात. जिथे मृत पावलेल्या व्यक्तिचा फोटोच त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. इथूनच चित्रपटाच्या मुळ विषयाला सुरुवात होते. एवढच नाही तर त्या मृत पावलेल्या व्यक्तिचा लहानपणीचा फोटो हार फुले घालून ठेवण्यात येतो, हे पाहुन तर माईंना एक वेगळीच जाणीव होते. एखाद्या व्यक्तिचा फोटोच नसेल तर त्या व्यक्तिची मृत्यूनंतर आठवणच नाहीशी होत जाईल या भावनेने माई स्वत:विषयीही विचार करु लागतात. लहानपणापासूनच फोटो काढून घेण्यापासून दूर पळणाऱ्या, फोटो काढण्याची भिती असणाऱ्या आणि एकही चांगला फोटो नसलेल्या माईंचा स्वत:चा एक चांगला फोटो काढण्याचा नवा प्रवास सुरु होतो.

माईंचा हा प्रवास आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांनी त्यांच्या लेखणीतून उत्तमरित्या मांडला आहे. पटकथेतील बारकावे थक्क करणारे आहेत जे चित्रपटात विविध रंजक वळण घेऊन येतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा प्रवास या कथेत गुंतून ठेवतो. त्यात कुढेच गुंतागुंत जाणवत नाही. सामान्य प्रसंगांमधून असामान्यता निर्माण करण्याची ताकद दिग्दर्शनात असते. ही धुरा नवोदित दिग्दर्शक आदित्य राठी गायत्री पाटील यांनी उत्तमरित्या सांभाळलेली पाहायला मिळते. साध्या सरळ दृश्यांमधूनही त्याचा मोठा प्रभाव त्यांच्या दिग्दर्शनात जाणवतोय. सहज सुंदर पद्धतीने केलेले विनोदी सीन्स या चित्रपटात लक्षवेधी ठरतात. 
अभिनयाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी माईंच्या भूमिकेचं अक्षरश: सोनं केलंय. स्वत:विषयी जास्त विचार न करणारी गृहिणी जेव्हा स्वत:चा एक फोटो काढून घेण्याचा विचार करते या भावनेचे बारकावे त्यांनी या चित्रपटाच्या पात्रातून सहजरित्या समोर आणलेत. माईंच्या अबोल वागण्यातील भावही त्यांनी उत्तम सादर केले आहेत. संपूर्ण चित्रपटात हा माई या एकाच पात्राच्या भोवती फिरणारी ही कथा असल्याने नीना कुळकर्णी यांनी ही जबाबदारी लिलया पेलली आहे, ज्यामुळे माईंच्या या संपूर्ण प्रवासात आपण हरवुन जातो.

या चित्रपटातील इतर भूमिकाही कलाकारांनी चोख पार पाडल्या आहेत. मोलकरणीच्या भूमिकेत चैत्राली रोडे लक्ष वेधून घेते. अमिता खोपकर, विकास हांडे, समीर धर्माधिकारी, समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर, निलकंठ सावंत या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांचा कालावधी चित्रपटात कमी असला तरी त्या त्या त्या ठिकाणी ते प्रभावी ठरतात. 


तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट मजबुत वाटतो. केदार फडके यांची सहज सुंदर सिनेमॅटोग्राफी चित्रपटाला साजेशी आहे. कौशल इनामदार यांचं संगीत आणि वैभव जोशी यांचे गीत हे या चित्रपटात वेगळीच मजा आणतात. चित्रपटाची हटके गाणी लक्ष वेधून घेतात. सौरभ भालेराव यांचं बॅकग्राउंड स्कोर या चित्रपटाला लाभलय. जे आणखी चांगलं करता आलं असतं, ज्याने सीन आणखी खुलले असते. बी. महंतेश आणि रोहन विजय सरोडे या एडिटर्सचं काम चांगलय. पण त्यात काही बारकाव्यांचा विचार करुन काम करता आले असते.

आपल्या फोटोंना आपण स्वाभाविकपणे कसं गृहीत धरतो हा खोल विचार यात मांडला आहे. आपला फोटो आपले व्यक्तिमत्त्व कसे दर्शवतो याचे बारकावेही या कथेत पाहायला मिळतात. त्यामुळे ‘फोटो प्रेम’ चित्रपटाचा हा अविस्मरणीय प्रवास अनुभवायलाच हवा

Recommended

Loading...
Share