दिग्दर्शक: आदित्य सरपोतदार
कलाकार: रितेश देशमुख, सय्यामी खेर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ जाधव
लेखक: क्षितीज पटवर्धन
वेळ: 2 तास
रेटींग : 3.5 मून
अॅक्शनपॅक सिनेमे तसे मराठीत नवे नसले तरी त्यांचा ट्रेंड हळूहळू रुजू होतोय. या सिनेमांना कथानक आणि योग्य मनोरंजनाची फोडणी देऊन तो झक्कासपणे पडद्यावर सादर केला जातो. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने मराठी सिनेमामधील अॅक्शनचा नवीन ट्रेंड सुरु केला. आता त्यानंतर असंच एक अॅक्श-इमोशन आणि जोडीला सुंदर कथानक असलेला अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित ‘माऊली’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कथानक
कथानकाला खरी सुरुवात होते ती पंढरपूर जवळच्या कापूरगावातून. इतर सामान्य गावांसारखंचं एक देवभोळं गाव. तिथे माऊली सर्जेराव देशमुख (रितेश देशमुख) या तरुण सबइन्सपेक्टरची बदली होते आणि गावात नाट्यमय घडामोडींना वेगळं वळण मिळतं. गावातील गुन्हेगारी साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट नाना लोंढे (जितेंद्र जोशी)ला धडा शिकवण्याचा विडा माऊली उचलतो. त्याला यासाठी प्रेरित करण्यामागे खरा वाटा असतो तो गावातील मसालेवाली रेणुकाचा (सय्यामी खेर). यातूनच नकळत दोघांमध्ये प्रेमही फुलतं. पण खरा प्रश्न उरतो तो गावातील गुंडगिरीला नेस्तनाबूत करण्याचा. यात माऊलीला खरी साथ लाभते ती कडकनाथ (सिद्धार्थ जाधव) याची. नाना लोंढेशी टक्कर घेणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. माऊलीला यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नाना लोंढेच्या दहशतीतून माऊली गावाला कसं सोडवतो हे पडद्यावर पाहणं रोमांचकारी ठरतं.
दिग्दर्शन
अॅक्शनपॅक माऊली सिनेमा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. दिग्ददर्शक अजय सरपोतदार यांनी अॅक्शन आणि इमोशनची योग्य सांगड घालत क्षितिज पटवर्धन यांची कथा पडद्यावर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गावगुंड आणि गावाचं रक्षण करण्यासाठी असलेला पोलिस हे कथानक आपल्यासाठी नवीन नसलं तरी या सिनेमात त्याचं सादरीकरण उत्तम जमून आलंय. पण सतत अॅक्शनचा भडिमार नकोसा वाटतो.
संगीत
सिनेमाला अजय आणि अतुल यांनी दिलेलं संगीत अप्रतिमच आहे. सर्वच गाणी प्रेक्षकांच्या ओठावर रुळतात. या सिनेमाचं पार्श्वसंगीत शेवटपर्यंत मनाला मोहवतं.
अभिनय
या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी मनापासून निभावली आहे. माऊलीच्या भूमिकेत असलेल्या रितेश देशमुखने त्याच्या व्यक्तिरेखेत जान ओतली आहे. एक दबंग पोलिस साकारत त्याच्या चाहत्यांना खुष केलं आहे. सय्यामी खेरचा हा पहिला मराठी सिनेमा आहे असं अजिबात वाटत नाही. तिने रेणुका मसालेवालीची भूमिका उत्तम साकारली आहे. सिद्धार्थ जाधवचा कडकनाथ कमी लांबीच्या भूमिकेतही जास्त भाव खाऊन जातो. लास्ट बट नॉट लीस्ट सिनेमाचा व्हिलन नाना लोंढे अर्थात जितेंद्र जोशी. त्याचा अभिनय पाहुन नानाची व्यक्तिरेखा खास त्याच्यासाठीच लिहिली होती कि काय असं वाटल्याशिवाय रहात नाही.
सिनेमा का पाहावा?
धम्माल अॅक्शन-इमोशनचं समीकरण असलेला हा सिनेमा मनोरंजनाचं खच्चून भरलेलं पॅकेज आहे. त्यामुळे बच्चेकंपनींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण हा सिनेमा एकत्र एन्जॉय करु शकतात.
https://www.youtube.com/watch?v=fqXkBRGAEnI