Samantar 2 Review : ती रहस्यमयी बाई आणि सुदर्शन चक्रपाणीच्या भूतकाळाशी समांतर जगणाऱ्या कुमारच्या अकल्पनीय वर्तमानकाळाचा थरार

By  
on  

सिरीज – समांतर 2
स्ट्रीमिंग – एम एक्स प्लेयर
दिग्दर्शक – समीर विद्वांस
मूळ कथा – सुहास शिरवळकर 
कलाकार – स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज, जयंत सावरकर, नितीन बोधारे, गणेश रेवाडेकर, मनोज कोल्हटकर
निर्मिती – अर्जून सिंह बरन, कार्तिक निशानदार
रेटिंग – 3.5 मून्स 

“जे घडायचं ते घडणारच..” या सुदर्शन चक्रपाणीच्या म्हणण्यानूसार कुमारच्या आयुष्यात विविध गोष्टी घडत जातात. सुदर्शन चक्रपाणीच्या भूतकाळाशी समांतर जगणारा कुमार महाजन, त्याला खुणावणारा भविष्यकाळ, या कथेतील गुढ आणि थरार मागील वर्षी समांतर या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळाला. सुहास शिरवळकर यांच्या समांतर पुस्तकावर आधारित या सिरीजचा पहिला सिझन प्रचंड लोकप्रिय ठरला.   सिरीजचं आता दुसर पर्व प्रदर्शित झालय. पहिल्या सिझनमध्ये अपूर्ण राहिलेली कहाणी आता भविष्यकाळात घेऊन जाते ? की भूतकाळातील वर्तमानकाळ समोर घेऊने येते ? याची उत्तरं समांतर 2 मध्ये पाहायला मिळतायत.
पहिल्या पर्वात सुदर्शन चक्रपाटीचा शोध घेतल्यानंतर काही अटींसह भविष्याचा वेध घेणाऱ्या डायऱ्या सुदर्शन चक्रपाणी हा कुमारच्या स्वाधीन करतो. त्यानंतर काय घडतं हे दुसऱ्या सिझनमध्ये पाहायला मिळतय. सुदर्शन चक्रपाणीने दिलेल्या डायऱ्यांमध्ये कुमार महाजनच्या भविष्याचा तपशील आहे. त्यानूसार कुमार दररोज एक पान वाचून त्याचं भविष्य जाणून घेतो. याचाच परिणाम म्हणजे त्याच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होऊ लागतो. त्याची आर्थिक परिस्थिती अधीक सुधारू लागते. नोकरीत यश आणि पैसा हातीशी आल्यावर कुमारला जणू आकाशवाणी सापडल्याचं वाटू लागतं. त्याच्या वागण्यातही बदल होऊ लागतो. या बदलाची वेगवान गती आणि काही चूकांमुळे कुमारच्या आयुष्यात अकल्पनीय गोष्टी घडू लागतात. भविष्य उजळवण्याच्या धुंदीत असलेल्या कुमारला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. या सगळ्यात त्याची पत्नी निमा मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. मग कुमारच्या आयुष्यात कोणते अडथळे येतात ? सुदर्शन चक्रपाणीच्या भूतकाळातील कोणत्या घटना कुमार महाजनच्या वर्तमानकाळात त्याला मोठा धक्का देतात याचं गुढ या सिरीजमध्ये पाहणं रंजक ठरतय. 

दुसऱ्या सिझनमध्येही अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या अभिनयकौशल्याने कुमार महाजनच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेतोय. कुमार महाजनचा शिवीगाळ करणारा रागीट, विक्षिप्त स्वभाव स्वप्नीलच्या रुपात पाहायला वेगळा भासतो. त्याच्या या पात्रातील वैशिष्ट्ये या सिझनमध्ये प्रकर्शाने जाणवतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वप्नील त्या भूमिकेत इतका समरस झालाय की तो कुमार महाजनच्या व्यक्तिरेखेत चांगला मुरलाय. भविष्य गवसल्यानंतरच्या कुमारच्या पात्रातील बारकावे त्यांने उत्तम सादर केले आहेत. 

सुदर्शन चक्रपाणीची व्यक्तिरेखा पहिल्या सिझनमध्ये फार कमी कालावधीसाठी पाहायला मिळाली होती. मात्र दुसऱ्या सिझनमध्ये प्रत्येक भूमिकेला चांगला वाव मिळालाय. अभिनेते नितीश भारद्वाज हे सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत पहिल्या सिझनपासूनच योग्य वाटतात. या भूमिकेतील बोलण्याची लकब, पात्रातील विविध छटा या नितीश यांच्या रुपात पाहायला मजा येते.

पहिल्या सिझनमध्ये क्वचितच दिसणाऱ्या निमा महाजनचा दुसऱ्या पर्वात महत्त्वाचा सहभाग आहे . अर्थात निमाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या सिझनमध्ये चांगलीच भाव खाऊन गेलीय. निमाच्या पात्रातील विविध छटा, प्रसंग, संवाद या सगळ्यात तेजस्विनीने सहज  अभिनय केलाय. तिने आत्तापर्यंत साकारलेल्या उत्तम भूमिकांच्या यादीत आता निमा या पात्राचाही सहभाग होईल यात शंका नाही.

दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षक म्हणून सातत्याने शोध सुरु असतो तो त्या बाईचा.. जेव्हा ती बाई कथेत एन्ट्री घेते तिथून या कथेला वेगळं वलय प्राप्त होतं. सई ताम्हणकरचं पात्र या कथेत कोणत्या वळणावर येतं ? या व्यक्तिरेखेमुळे कथेत काय ट्विस्ट येतो हे पाहणं अतिशय रंजक आहे. या बाईचं पात्र साकारलय अभिनेत्री सई ताम्हणकरने.

 सईच्या पात्रांविषयीचा खुलासा करणं म्हणजे कथेतील गुढ समोर न आणता थोडक्यात सांगायचं झालं तर या सिरीझमधील सईची उत्कंठावर्धक भूमिका ही या पर्वातील महत्त्वाचा आणि लक्षवेधी भाग आहे. सईचा याआधीही पाहिलेला सुंदर, बोल्ड लुक या सिरीजमध्येही पाहायला मिळतोय. मात्र फक्त त्या जोरावर नाही तर सई साकारत असलेल्या पात्रांची ओळख, त्या व्यक्तिरेखेचे बारकावे समोर आणण्यात,  मीरा बावीस्कर आणि सुंदरा या दोन्ही पात्रांमधील वेगळेपण दाखवण्यात सई यशस्वी ठरलीय.

सिरीजमधील सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे स्वामींच्या भूमिकेतील जयंत सावरकर, हणम्याच्या भूमिकेतील नितीन बोधारे, कुमारच्या मित्राच्या भूमिकेतील गणेश रेवाडेकर, निमाच्या वडिलांच्या भूमिकेतील मनोज कोल्हटकर या कलाकारांनी उत्तम काम केलय. 

पहिल्या पर्वाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन केलय. दोन्ही सिझन समांतर रेषेत ठेवून दिग्दर्शकाने दुसरं पर्व आणखी थरारक आणि रंजक बनवलय. पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱं पर्व यशस्वी करण्याची जबाबदारी समीर यांनी उत्तम सांभाळलीय. दुसऱ्या पर्वात सुहास शिरवळकर यांच्या मुळ कथेचा गाभा तसाच ठेवून कथेतली गुढता अतिशय रंजक पद्धतिने मांडलाय. 

आकाश अग्रवाल यांची सिनेमॅटोग्राफी ही विविध प्रसंगातील थरार कायम ठेवण्यात मदत करतात. या सिरीजमध्ये गुढता आणि थरार यांचा मिलाप असला तरी सिरीजच्या काही भागांनी कमी वेग धरलाय. मात्र सुरुवातीपासून कथेतील वेगवान गती एकामागोमाग एक असे दहा भाग सलग पाहण्यास भाग पाडते. बॅकग्राउंड स्कोअरवर आणखी भर दिला असता तर काही थरारक प्रसंगांना न्याय मिळाला असता. असं असलं तरी कुठेही कथा ओढूनताणून सादर केलेली जाणवत नाही हे या सिरीजचं यश आहे.

कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी यांचे एकत्र सीन पाहणं ही खास ट्रीट या सिरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज आमने सामने म्हणजेच चक्रपाणी आणि कुमारच्या पात्रातील एकत्र सीन दुसऱ्या सिझनमध्येही उत्कंठा वाढवणारे आहेत. निमा आणि कुमारच्या प्रेमातील वेडेपणा, त्यांचे रोमान्स सीनही आहेत. ज्यात स्वप्निल आणि तेजस्विनीची उत्तम केमिस्ट्री जाणवते.  
पहिल्या सिझनच्या रोमांचकारी अनुभवानंतर दुसरा सिझन अतिशय उत्कंठावर्धक, रहस्यमयी, रंजक, कथेतील कमालीची गुढता विविध टप्प्यांवर जाणवते. या सगळ्यात कुमारला त्याचं भविष्य गवसतं का ?  काळाचा फेरा तोडण्यात कुमार महाजनला यश मिळेल का ? ती बाई कोण ? याची उत्तरं मिळवायची असतील  तर 10 भागांची समांतर 2 सिरीज नक्की बघा. 

 

 

Recommended

Loading...
Share