By  
on  

Zombivli Review : मराठीतल्या पहिल्या वहिल्या झॉम–कॉमचा यशस्वी प्रयत्न.. रोमांचकारी थरारक अनुभव

चित्रपट –  झोंबिवली
दिग्दर्शन – आदित्य सरपोतदार
कथा – महेश अय्यर
कलाकार – अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, तृप्ती खामकर, जानकी पाठक
रेटिंग -  3.5 मून्स

आदित्य सरपोतदार हा मराठी सिनेमात विविध प्रयोग करणारा दिग्दर्शक आहे. यंदाही ‘झोंबिवली’ चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा प्रयोग त्यांनी केलाय. इंग्रजीसह कोरियन आणि विविध भाषांमध्ये झोंबी फिल्म्स बनवल्या गेल्यात. हिंदीतही हा प्रयोग करण्यात आला. मात्र झोंबी फिल्म तेही मराठीत याचा विचार प्रेक्षकांनीही केला नसेल. मराठीत झॉम – कॉम आणण्याचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि त्यांच्या टीमचा निर्णय चूकीचा नव्हता असं हा चित्रपट पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवतं. 

अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कथेविषयी थोडक्यात सांगायच तर अमेय वाघ हा सुधीरच्या भूमिकेत आहे. जो इंजिनियर असून त्याची गरोदर पत्नी सीमा (वैदेही परशुरामी) सोबत तो डोंबिवलीमधील एका टॉवरमधील नव्या घरात रवाना होतो. जिथे पाण्याचा तुटवडा असतो. टॉवरला जोडूनच जनता नगर नावाची वस्ती आहे. याच जनता नगरमध्ये विश्वास (ललित प्रभाकर) राहतो जो वस्तीच्या युनियनचा लीडर आहे. सुधीर आणि सीमाच्या घरात एक मालती (तृप्ती खामकर) नावाची मोलकरीण आहे जी प्रचंड धीट आहे. तर डोंबिवलीतील एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे अभिनेत्री जानकी पाठक. 

या पात्रांच्या आयुष्यात झोंबी कसे येतात हे चित्रपटात पाहणं रंजक ठरतय. डोंबिवलीत झोंबींचा शिरकाव कसा होतो, जनता नगरमध्ये हे झोंबी कसे तयार होतात याला एक वेगळं स्वरुप देण्यात आलय. सामाजिक संवेदनेतून ही कथा खुलत जाते. ज्यात उत्तम मांडणी, अभिनय आणि कथेच्या जोरावर चित्रपटाने बाजी मारलीय.  
सुधीर हा थोडासा भित्रा, साधा आणि त्याच्या पत्नीवर अत्यंत प्रेम करणारा असा पती अमेयने साकारलाय. सुधीरची भूमिका ही कथेत विनोदी तडका देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जे अमेय वाघने उत्तमरित्या साकारलय. सीमाच्या भूमिकेत वैदेही ही बिनधास्त मुलगी आहे. गरोदर असतानाही तिच्या चातुर्याने ती झोंबीसोबत कसा लढा देते हे पाहणं मजेशीर आहे. सीमाच्या भूमिकेत वैदेही परशुरामी लक्ष वेधून घेते. शिवाय काही सीन्समध्ये तिच्या भूमिकेने कॉमेडी तडका आणलाय. या सगळ्यात लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे विश्वास. विश्वासच्या भूमिकेत विविध पैलू आहेत. बिनधास्त आणि रांगडा अंदाज असलेला विश्वास ललितने उत्तम साकारलाय. त्याचे डायलॉग, देहबोली, एक्शनने चित्रपटात रोमांच आणलाय. मालतीच्या भूमिकेत तृप्ती खामकरच्या वाट्याला कमी संवाद असतानाही ती उठून दिसतेय. छोट्या कॉमेडी पंचमधूनही ती चांगलीच भाव खाऊन जातेय. पत्रकाराच्या भूमिकेतील जानकी पाठकच्या भूमिकेला फारसा वाव दिसत नाही. रेणुका दफ्तरदार आणि विजय निकम हे पाहुणे कलाकारही चित्रपटात पाहायला मिळतात.

चित्रपटाची तांत्रिक बाजू अत्यंत मजबूत असल्याने हा झॉम – कॉम यशस्वी करण्यात ही बाजू महत्त्वाची ठरलीय. झोंबींचं दिसणं, त्यांची लकब, आवाज या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्याचं पाहायला मिळतय. झोंबींमधील बारकावे चित्रपटात सहजरित्या समोर आणण्यात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना यश आलय. वीएफएक्स आणि प्रोस्थेटिकचा योग्य आणि परिपूर्ण वापरही जाणवतो. 

लॉरेन्स एलेक्सचं उत्तम छायांकन दृष्यांमध्ये थरार आणण्यात मदत करते. जयंत जठार यांचं संपादन सुटसुटीत आहे. मनोहर वर्मा यांनी फाईट सीन्स चांगल्या पद्धतीने केलेत. मुख्य म्हणजे ललित प्रभाकरचे फाईट सीन्स छान झालेत. ए व्ही प्रफुलचंद्रा यांची गाणी आणि बॅकग्राउंड संगीत हे सीन्सचा थरार वाढवतात.   ज्याने चित्रपटाचा रोमांच आणखी वाढवलाय. चित्रपटातील कॉश्यूम, मेकअप टीमनेही चोख काम केलय. 
पुर्वार्धात चित्रपटाते उत्तम गती पकडलीय. त्यामुळे कथा फार ताणली गेलेली नाही. मात्र उत्तरार्धात काही सीन्स वेळखावू वाटतात. विनोदाच्या बाबतीत आणखी चांगलं लिखाण झालं असतं तर कॉमेडी आणखी खुलून दिसली असती. मात्र थरार आणि कॉमेडी यांचं उत्तम संतुलन राखण्यात आलय. चित्रपटातील पात्रांचा झोंबींसोबतचा लढा याचं रोमांचकारी चित्रण आणि थरार याचा उत्तम मेळ जुळलाय.


या चित्रपटातील झोंबी पाहुन भिती वाटेत आणि रोमांचकारी थरारक अनुभव मिळतो. हा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल, मराठी मातीतले झोंबी पाहायचे असतील तर मराठीतील पहिला वहिला झॉम क़ॉम चित्रपट झोंबिवली नक्की पाहा. 


 

Recommended

PeepingMoon Exclusive