चित्रपट – पांघरुण
दिग्दर्शन – महेश मांजरेकर
कलाकार – गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, सुलेखा तळवलकर
रेटिंग - 3.5 मून्स
‘पांघरुण’ या चित्रपटात आहे एक ह्रदयस्पर्शी प्रेमकहाणी आणि त्यासोबत चित्रपट रसिकांसाठी उत्कृष्ट गाण्यांनी सजलेली सांगितीक मैफिल. साहित्यिक बा. भ. बोरकर यांच्या लघुकथेवरुन पांघरुणची गोष्ट प्रेरित आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ दाखवल्याने समाजातील त्या काळच्या अनिष्ठ रुढी पंरपरा, बालविवाह या गोष्टी प्रकर्षाने पाहायला मिळतात.
महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेत्री गौरी इंगवलेने मुख्य भूमिकेतून पदार्पण केलय. गौरी या चित्रपटात लक्ष्मीच्या भूमिकेत दिसते. अभिनेते अमोल बावडेकर यांनी अनंत म्हणजेच अंतू गुरुजींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता रोहित फाळके मोहनच्या भूमिकेत दिसतो. अभिनेत्री सुलेखा तळवलकर राधा अक्काच्या भूमिकेत झळकतेय.
गौरी ही तरुण विधवा आहे. जिला नृत्याची आवड असून ती बॅले नृत्याचं प्रशिक्षण घेतेय. तर अंतु गुरुजी हे विधुर आहेत. मात्र गावातील एक विद्वान आणि सज्जन पुरुष म्हणून त्यांची ओळख असून गावात त्यांना मान सन्मान आहे. याच अंतु गुरुजींसोबत गौरीचा विवाह होतो. जे जवळपास तिच्या वडिलांच्या वयाचे आहेत. मोहन हा अंतु गुरुजींचा तरुण शिष्य आहे. दुसऱ्या विवाहानंतरही अंतु गुरुजी हे कैलासवसी पत्नी जानकीच्या आठवणीत असतात. ज्यामुळे गौरीसोबतचं त्यांचं पती-पत्निचं नातं खुललेलं नाही. सासरी सुखात असलेली लक्ष्मी लैंगिकदृष्ट्या मात्र निराश आहे. या सगळ्यात मोहन मात्र लक्ष्मीकडे आकर्षित होतो. मात्र लक्ष्मी आणि अंतु गुरुजींच्या नात्यातील शुद्ध हळव्या भावना आणि त्यातील संवेदनशीलता याचा प्रवास ह्रदयस्पर्शी आहे.
चित्रपटात 60 च्या दशकातील काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य यात तो काळ पड्यद्यावर अक्षरक्ष:जिवंत केला गेलाय. आजवर उत्तमोत्तम कलाकृती महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांना दिल्यात. पांघरुणही त्याला आता अपवाद नाही. प्रत्येक फ्रेम आणि दृश्ये कथेचं सौंदर्य खुलवणारी, काळजाला भिडणारे संवाद, उत्कृष्ट श्रवणीय गाणी यांचा मिलाप जुळून आलाय. या सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आणण्याची ताकद महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनात असल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलय. प्रत्येक भूमिकेचं व्यक्तिचित्रण उत्तमरित्या रंगवण्यात आलय.
लक्ष्मीच्या भूमिकेतील निरागसता गौरी इंगवलेने चोख पार पाडलीय. तिचा अभिनय सहज वाटतो. भावनिक दृश्यातही कुठेही अभिनय अतिरिक्त वाटत नाही. अमोल बावडेकर या अभिनेत्याला गायनाची, संगीताची उत्तम जाण असल्याने अंतु गुरुजींच्या भूमिकेत ते योग्य वाटतात. विशेषकरुन भजन, किर्तनाच्या दृश्यात तर अमोल बावडेकर लक्ष वेधून घेतात. मोहनच्या भूमिकेत रोहित फाळकेचंही छान काम झालय. अभिनेते विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, सुरेखा तळवलकर यांच्या अभिनयातून त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांमधून कथेला उत्तम साथ मिळतेय. राधा अक्काच्या भूमिकेत सुरेखा तळवलकर यांचं काम छान झालय.
सांगितिकदृष्ट्या हा चित्रपट उजवा ठरलाय. चित्रपटात एकूण नऊ गाणी आहेत. चित्रपटातील गाण्यांमध्ये उत्तम गीत, संगीत, सुरले गायनाचा मेळ जुळून आलाय. या हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब यांचे या चित्रपटातील गाण्यांना संगीत लाभले असून यात संत तुकाराम आणि संत सावळा माळी यांचे अभंग आहेत. तर दोन गाणी वैभव जोशी यांची आहेत. ही मन प्रसन्न करणारी गाणी सांगितिक मैफिलीचा आनंद देतात.
तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट परिपूर्ण ठरलाय. सुंदर छायांकन आणि सुटसुटीत संपादन या चित्रपटाची जमेची बाजू आहे. कोकणातील निसर्गरम्य दृश्ये उत्तम टिपण्याती आली आहेत. त्याकाळची घरं, पेहराव त्यातील बारकावे यावर चांगलं काम करण्यात आलय. पार्श्वसंगीतांनी दृश्ये छान खुलुन आली आहेत.
फक्त मनोरंजन म्हणून नाही तर एक उत्तम कलाकृती, एका विलक्षण प्रेमकहाणीचा अनोखा कलाविष्कार पाहण्याचा आनंद अनुभवायचा असेल तर पांघरुण हा चित्रपट नक्की पाहा.