By  
on  

Pondicherry Review : स्मार्ट फोनवर चित्रीत केलेली कलात्मक कलाकृती 

चित्रपट – पाँडिचेरी
दिग्दर्शक – सचिन कुंडलकर
लेखन – तेजस मोडक, सचिन कुंडलकर
कलाकार – सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, तन्मय कुलकर्णी, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, महेश मांजरेकर
रेटिंग – 3 मून्स 

चित्रपटनिर्मितीत अनेक दिग्दर्शक विविध प्रयोग करु पाहत आहेत. या प्रयोगात एक गोष्ट मात्र कायम असते ती म्हणजे चित्रपट शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा. मग तो कोणत्याही प्रकारचा कॅमेरा असेल. मात्र चित्रीकरणासाठी कॅमेरा वापरलाच नाही तर..? हाच प्रयोग करुन पाहिलाय दिग्दर्शक, लेखक सचिन कुंडलकर यांनी. कॅमेराच्या जागी त्यांनी वापरला स्मार्टफोन. पाँडिचेरी हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलाय. हे या चित्रपटाचं महत्त्वाचं आकर्षण आहे. 
अभिनेत्री सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, तन्मय कुलकर्णी, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, महेश मांजरेकर हे कलाकार या चित्रपटात विविध भूमिका साकारतायत. 
चित्रपटाची कथा विविध नात्यांमध्ये गुंतलेली आहे. निकीता (सई ताम्हणकर) ही एक मराठी मुलगी असून तिचा मुलगा ईशान (तन्मय कुलकर्णी) सोबत ती पाँडिचेरी येथे राहते, जिथे ती होम स्टे चालवते आणि पर्यटन मार्गदर्शक म्हणूनही काम करते. याच होमस्टेमध्ये राहण्यासाठी एके दिवशी रोहन (वैभव तत्त्ववादी) नावाचा तरुण येतो. निकीताची रोहनशी मैत्री होते. निकीता आणि रोहनच्या नात्यातील गुंता यात समोर आलेला रोहनचा भूतकाळ या गोष्टी कश्या जुळून येतात हे कथा जशी पुढे जाते तसं उलगडत जातं. कथेतील ट्विस्ट अत्यंत साध्या पद्धतिने समोर येतात. त्यातील सहजपण बघायला छान वाटतं. याच नात्यातील गुंत्यात आणखी एक पात्र समोर येतं. हे पात्र आहे मानसीचं (अमृता खानविलकर). जे कथेत एक वेगळा रंग भरतं. अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी निकीताच्या आईची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता गौरव घाटणेकर मानसीचा फियॉन्से म्हणजेच भावी पती आहे. 


या विविध पात्रांचा एकमेकांशी गुंता असला तरी हा गुंता निकीताच्या पात्राभोवती फिरणारा आहे. ही कथा पाँडिचेरी मधील सुंदर, नयनरम्य दृश्यांमधून मांडण्यात आलीय. या चित्रपटातून सई ताम्हणकरने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाच्या कक्षा रुंदावत निकीताचं पात्र साकारलय. स्वत:च्या आय़ुष्यातील दु:ख अथांग समुद्राच्या प्रवाहासारख्या वाहणाऱ्या मनात खोलवर साठवून ठेवून पाँडिचेरीचं सौंदर्य पाहणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम करणारी निकीता कशी असेल याचे अनेक बारकावे सईने तिच्या पात्रातून साकारले आहेत. वैभव तत्त्ववादी साकारत असलेल्या रोहनच्या पात्रात अनेक पैलू आहेत. त्याचा वर्तमानकाळ आणि भूतकाळाला जोडणाऱ्या मार्गात तो कुढेतरी अडकलेला जाणवतो. रोहनचं पात्र कसं वेगळय हे वैभवने उत्तम सादर केलय.तन्मय कुलकर्णी मात्र ईशानच्या भूमिकेतून भाव खाऊन जातोय. या बालकलाकाराच्या वाट्याला तगडे संवाद आले असून त्याने पात्र चोख पार पाडलय. अमृता खानविलकर मानसीच्या भूमिकेत भावनात्मक प्रवास सादर करते. छायाचित्रकार असलेल्या मानसीच्या दृष्टीकोनातून पाँडिचेरी कसा वेगळा भासतो हे जाणवतं. नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, महेश मांजरेकर यांनी त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिलाय. या चित्रपटातील प्रत्येक पात्र पाँडिचेरीच्या सौंदर्यात वेगळे रंग भरतात. 


सचिन कुंडलकर यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातही जाणवते. चित्रपटाला मिळणारं कलात्मक स्वरुप ही त्यांची ओळख या चित्रपटातही जाणवते. उत्तम कलाकारांची निवड आणि सादरीकरण यामुळे या चित्रपटाला वेगळं स्वरुप प्राप्त होतय.रोहन, मानसीच्या दृष्टीकोनातून पाँडिचेरीचा समुद्र वेगळा भासतो, तर निकीता या अथांग समुद्राकडे एका वेगळ्या आशेने पाहते. चित्रपटातील हे बारकावे कलात्मक आहे. 
कमकुवत पटकथेमुळे चित्रपटाची गती अनेक ठिकाणी मंदावते. मात्र हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत झाला असूनही पात्रांचे बारकावे, दृश्यांमधून बोलणारे संवाद आणि निसर्गरम्य पाँडिचेरी स्मार्टफोनमधून उत्तम टिपलाय. कुठेही हा चित्रपट स्मार्टफोनमधून चित्रीत झाल्याचं जाणवत नाही जिथे या प्रयोगाला यश आल्याचं म्हणावं लागले. मिलिंद जोग यांचं छायांकन या चित्रपटाची जमेची बाजू आहे. पाँडिचेरीचं सौंदर्य त्यांनी उत्तम टिपलय. संकलनात काहीशा त्रुटी मात्र जाणवतात. दृश्यांमधील असलगता काही ठिकाणी जाणवते. चित्रपटाची गाणी छान झाली आहेत. पार्श्वसंगीत फार कमी प्रमाणात आहेत.  या बाबी सोडल्या तर हा चित्रपट म्हणजे एक कलात्मक कलाकृती आहे. 

कमी संवादांसह या चित्रपटातील बराचसा भाग दृश्यांमधून बोलतो. पाँडिचेरीमधील रंगवलेल्या भिंती, समुद्र, रस्ते विविध नेत्रदिपक दृश्ये पाहणं रंजक ठरतं. पाँडिचेरीचं सौंदर्य, सचिन कुंडलकरांचं सादरीकरण आणि सई ताम्हणकरचा अभिनय ही हा चित्रपट पाहण्याची महत्त्वाची कारणे आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive