सिनेमा : उरी : द सर्जिकल स्ट्राईक
दिग्दर्शक : आदित्य धार
कलाकार : विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल, मोहीत रैना
रेटींग : 3.5 मून
जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून दोन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ‘उरी’ सिनेमा उलगडतोय. विकी कौशल, यामी गौतम आणि परेश रावल यांच्या दमदार अभिनयाने हा सिनेमा सजला आहे.
कथानक 19 सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथील सैन्याच्या बेस कॅम्पवर अचानक दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे 19 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर देशवासियांमध्ये पाकिस्तानविरोधातील असंतोष आणखी उफाळून आला. पाकिस्तानच्या या निंदनीय कृत्याचे पडसाद सर्वच स्तरातून उमटू लागले. तेव्हा सैन्यापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच पाकिस्तानचा बदला घेण्याची इच्छा होती. म्हणूनच मग सरकारच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानची ही खोड चांगलीच मोडून काढली.
दिग्दर्शन सिनेमाची सुरुवात काहीशी संथ वाटते. कथानक व पात्रांची ओळख समजून घेईपर्यंत सिनेमा बराचसापुढे गेलेला आहे. एखाद्या युध्द पार्श्वभूमीच्या सिनेमात जसे एखाद-दोऩ एक्शन सीन्स असतात. तसे ते ह्यातही पाहायला मिळतात. सर्जिकल स्ट्राईक हे ऑपरेशन नेमकं काय आहे, याचं सिनेमात अगदी सविस्तर चित्रण पाहायला मिळतं. तसंच जबरदस्त एक्शन सीन आणि परिस्थितीला साजेसं पार्श्वसंगीत यामुळे देशभक्तीने अंगावर रोमांच उभे करण्यात दिग्दर्शक आदित्य धार यशस्वी ठरलाय. यहीं मौका है उनके दिल मे डर बिठाने का’, ‘ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा’ ‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी’ असे एकापेक्षा एका दमदार संवाद सिनेमात जान आणतात. अभिनय आदित्य धार यांच्या दिग्दर्शनात विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम या कलाकारांनी उरीची कथा पडद्यावर जिवंत केली आहे. विकीने आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय देत सहज भाव खाऊन गेला आहे. तर परेश रावल यांनीसुध्दा नेहमीप्रमाणेच तोडीस तोड अभिनय सादर केलाय. फक्त सैन्याच्या देहबोलीवर थोडं अजून काम करायला हवं होतं.
सिनेमा का पाहावा? जाज्वल्य देशाभिमान जागवणारा उरी हा सिनेमा सच्च्या देशभक्तांसाठी आहे. तर लहानांपासून-मोठ्यांपर्यंत ज्यांना भारताला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज का भासली हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा सिनेमा त्यांनी नक्की पाहायलाच हवा.