चित्रपट : वेलकम होम
दिग्दर्शन : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
कथा/पटकथा/संवाद : सुमित्रा भावे
संगीत : पार्थ उमराणी
रेटिंग : 2.5 मून
व्यावसायिक चित्रचौकट मोडून सकस कथानक आणि उत्तम मांडणी असलेले सिनेमे बनवण्यात सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीला मराठी सिनेविश्वात ओळखलं जातं. त्यांच्या आजवरच्या सिनेमांवर नजर फिरवली तर त्यांचे चित्रपट हे मनोरंजनासोबत प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. याच जोडीचा 'वेलकम होम' हा सिनेमासुद्धा स्वगृह म्हणजे नेमकं काय? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
कथानक:
सौदामिनी(मृणाल कुलकर्णी) ही नव-याशी भांडण झाल्याने बॅगा भरुन आपल्या सासुला सोबत घेऊन स्वतःच्या आईबाबांकडे रहायला येते. मुलगी अचानक माहेरी निघुन आल्याने आईवडलांना थोडीफार काळजी वाटते. दहा-बारा वर्षांचा संसार झालेल्या सौदामिनीला कृतीका नावाची सात-आठ छोटी मुलगी आहे. आई-वडलांच्या घरात रहायला आल्याने थोडीफार का होईना सौदामिनीला अडचण आणि अव्यक्त घुसमट वाटत असते. तीची छोटी बहीण मधु(स्पृहा जोशी) ही ताईचं मन वळवण्याचा आणि तीला खुश ठेवण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी ताई अचानच आल्याने तीची सुद्धा स्वतःची स्पेस हरवली जाते. सौदामिनीचा नव-यासोबतचा वाद विकोपाला जाऊन ती आई वडलांच्या घरी आली आहे हे कळताच तीचा जवळचा मित्र सुरेश(सुमीत राघवन) पुढच्या दिवशी तीला भेटायला येतो. जवळचा कोणीतरी माणुस असल्याने झालेल्या प्रकाराबद्दल सौदामिनी थोडीफार सुरेशसमोर मोकळी होते. यासंबंध दिवसात सौदामिनीला 'स्व'ची जाणीव होऊन तीच्या स्वतःच्या अशा हक्काच्या घराची उणीव भासते. त्यानंतर अखेर ती कोणता निर्णय घेते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 'वेलकम होम' पाहुन कळेल.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी या सिनेमाला थोडा वेगळा टच दिला आहे. परंतु मुळात कथेचा जीव छोटा असल्याने अनावश्यक प्रसंगांमुळे सिनेमाची लांबी वाढुन सिनेमा थोडा संथ झाला आहे. या जोडीच्या आजवरच्या सिनेमांपेक्षा या सिनेमाची मांडणीसुद्धा थोडी वेगळी जाणवते. 'या खुदा' सारखं रिमिक्स गाणं या सिनेमात आहे. तसेच 'किर्र किर्र' आणि 'राधे राधे' ही गाणीसुद्धा सिनेमात ठीक वाटतात. 'राधे राधे' गाण्याच्या वेळी पाण्याचा केलेला वापर उल्लेखनीय आहे. संपुर्ण सिनेमा पुणे शहरात घडत असल्याने पुणे शहर या सिनेमात छान टिपलं आहे.
अभिनय:
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांच्या सिनेमात अनेक दिग्गज ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय अनुभवायला मिळतो. 'वेलकम होम' हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. या सिनेमाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम यांचा अभिनय पाहणं हा प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव आहे. मोहन आगाशे आणि सेवा चौहान यांची सिनेमातली नवरा बायकोची लव्हेबल केमिस्ट्री पहायला मजा येते. मृणाल कुलकर्णी यांनी सुद्धा सौदामिनीची अव्यक्त घुसमट अचुकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. सुमित राघवनचा सिनेमातला सहज वावर लक्षात राहण्यासारखा. काहीशा वेगळ्या भुमिकेत असलेल्या सुबोध भावेने सुद्धा सुंदर अभिनय केला आहे. स्पृहा जोशी, सारंग साठे, सिद्धार्थ मेनन, जितेंद्र जोशी आदी कलाकारांच्या छोट्या भुमिका सुद्धा लक्षात राहतात.
सिनेमा का पाहावा?
प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं छोटं का होईना पण एक घर असावं. पण यामागचा नेमका अर्थ काय याची जाणीव 'वेलकम होम' पाहुन होते. एकंदरीत ज्यांना नेहमीच्या मसालापटांपेक्षा विचारांना खाद्य पुरवणारे आणि सकस कथानकाला उत्तम अभिनयाची जोड असलेले सिनेमे आवडत असतील त्यांनी 'वेलकम होम'चा आवर्जुन आस्वाद घ्यावा.