Movie Review : हसून हसून लोटपोट करणारा ‘चोरीचा मामला’

By  
on  

सिनेमा : ‘चोरीचा मामला’
दिग्दर्शक : प्रियदर्शन जाधव
लेखक : प्रियदर्शन जाधव
कलाकार : जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, , अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर
कालावधी : 2 तास 13 मिनिटे
रेटींग : 3.5 मून्स

तुम्ही एखाद्या घरी चोरी झाल्याचं वृत्त ऐकल्यावर किंवा वाचल्यावर तुमच्या मनात काय येत..?  अशी चोरी आपल्या घरी होऊ नये असचं म्हणतो आपण. पण एखादा चोर प्रामाणिक असेल तर? पण चोर कधी प्रामाणिक असतो का ? याचं उत्तर आणि कदाचित असा चोर तुम्हाला सापडेल ‘चोरीचा मामला’ या विनोदी मराठी सिनेमात. अभिनेता प्रियदर्शन जाधव ने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शनचा हा दुसरा सिनेमा आहे. आणि प्रियदर्शननेच या सिनेमाचं लेखनही केलंय. एका रात्रीत घडलेली चोरी आणि ती चोरी होत असताना त्या चोरीमुळे होणारी गुंतागुंत या सिनेमाची कहाणी आहे.  मात्र याच चोरीचा थरार अतिशय मनोरंजक आणि विनोदी पद्धतिने प्रियदर्शन ने मांडलाय. अस्सल विनोदाची जाण असलेला अभिनेता या सिनेमाला दिग्दर्शक म्हणून लाभल्यानं विनोदाचं अचूक टायमिंग पडद्यावर पाहायला मिळतं.

अभिनेत्री अमृता खानविलकरसह जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग हे कसलेले कलाकार या सिनेमात आहेत. एका विनोदी सिनेमासाठी ही स्टारकास्ट असणं हेही या सिनेमाचं यश आहे आणि हे सिनेमा पाहताना या कलाकारांच्या अभिनयातून जाणवतं. जितेंद्र जोशीचा अभिनय तुम्ही आत्तापर्यंत विविध भूमिकांमधून पाहिलाय पण या सिनेमातील त्याने साकारलेली चोराची भूमिका चांगलीच प्रभावित करते. या भूमिकेत आणखी ट्विस्ट म्हणजे त्याचा पंजाबी लहेजा मजेशीर आहे. अमृता खानविलकर ही संपूर्ण सिनेमाभर प्रत्येक फ्रेममध्ये सुंदर दिसते. अमृता, हेमंत ढोमे, क्षिती जोग, जितेंद्र यांच्या एकत्र संवादातील विनोदाचं उत्तम टायमिंग पाहायला मिळतं आणि ते खळखळून हसवतं. किर्ती पेंढारकर आणि अनिकेत विश्वासराव या कलाकारांचे संवाद लेखनाच्या दृष्टीकोनातून कमी असले तरीही ते भाव खाऊन जातात. एकीकडे एका कॉमेडी पंचवर तुम्ही हसाल तर त्यातच दुसरा कॉमेडी पंच तुमच्या कानावर पडेल म्हणजे बॅक टू बॅक लाफ्टर आहे. 


सुरुवातीची काही मिनिटे नेमकं काय चाललयं या विचारात पाडतात. ती वगळली तर जितका या सिनेमाचा पूर्वार्ध हसवतो तितकाच उत्तरार्ध ही हसावतो. यासाठी बॅगराउंड स्कोरही तितकाच महत्त्वाचा ठरलाय. चिनार-महेश या प्रसिद्ध म्युझिकल जोडीने या सिनेमाचं उत्तम संगीत केलय. पूर्वार्धात असलेलं अमृता खानविलकरचा डान्स नंबर लक्षवेधी ठरतो. शिवाय सिनेमातील सगळ्या कलाकारांवर एकत्र चित्रीत केलेलं दुसर गाणं अगदी योग्य वेळी येतं, ऐकायला आणि पाहायला मजेशीर वाटतं आणि सिनेमा आणखी इंटरेस्टिंग होताना दिसतो.

हा सिनेमा शेवटपर्यंत विविध ट्विस्टने तुम्हाला चकित करतो. जेव्हा हा सिनेमा तुम्ही पाहायला सिनेमागृहात जाल तेव्हा हा सिनेमा तुम्हाला फक्त खुर्चीत खिळवून ठेवणार नाही तर खुर्चीत हसून हसून तुम्ही अक्षरशः लोटपोट व्हाल एवढं नक्की. हा सिनेमा का पाहावा ? मनसोक्त हसायचं असेल  तर हा सिनेमा नक्की पाहा. 

 

 

Recommended

Loading...
Share