By  
on  

Movie Review: रिंकू-चिन्मयच्या अभिनयाच्या टच-अपने ‘मेकअप’ झाला परिपूर्ण

कथा : गणेश पंडीत
कालावधी : 2 तास 40 मिनीटे 
दिग्दर्शन: गणेश पंडीत 
कलाकार : रिंकू राजगुरु, चिन्मय उदगीरकर, प्रतिक्षा लोणकर, राजन ताम्हाणे, तेजपाल वाघ, सुमुखी पेंडसे
रेटींग : 3 मून्स

 

'मेकअप' म्हणजे मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय.या विषयावर त्या जळी स्थळी काष्टाळी कुठेही आणि कधीही चर्चा करू शकतात. ही चर्चा निरंतर ठरते. पण याच विषयावर आधारित एक नवाकोरा चकचकीत सिनेमा नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे आणि याचं मुख्य आकर्षण आहे तुम्हा-आम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाची बरीच चर्चा रंगली होती व उत्सुकतासुध्दा होती. 

 

कथानक : 

पूर्वी ( रिंकू राजगुरू) ही पुण्यातील टीपिकल मध्यमवर्गीय घरातील  तरुणी. आई-बाबा, मोठा भाऊ आणि आजी असा सर्व गोतावळा असणारं हे कुटुंब. प्रत्येक घरात जशी वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची घाई सुरू असते,कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते तशीच पूर्वीच्या घरातही ती सुरू आहे. योग्य घरात तिचं लग्न लावून धन्य व्हावं, इतकीच तिच्या घरच्यांची माफक अपेक्षा. पण पूर्वी मुळातच आपल्या मनाप्रमाणे बिनधास्त-बेधडक आयुष्य जगणारी आणि तितकीच मोठ्या भावाला (तेजपाल वाघ) दचकून असणारी. 
मेकअप आर्टिस्ट म्हणून पूर्वीला करिअर घडवायचं आहे. आयुष्यात आपल्याला काय करायचंय हे पूर्वीला स्पष्ट माहितीय. पण अचानक एकदा तिच्या आयुष्यात डॉ.नील (चिन्मय उदगीरकर) येतो. नील मुळातच शांत स्वभावाचा असा तरूण डॉक्टर. अमेरिकेतील प्रॅक्टीसची संधी सोडून पुण्यातील हॉस्पिटलची निवड करणारा. आई-वडिलांसह त्रिकोणी कुटुंबात राहणारा आणि ऐषोआरामातील आयुष्य जगणारा. पण नीलच्या आयुष्यात येण्याने पूर्वीचं आयुष्य अचानक वेगळंच वळण घेतं. सुरुवातीला फक्त दोघांमध्ये मैत्री खुलते आणि एका वळणावर सर्वच बदलून जातं. कोणतं संकंट ओढवतं, नेमकं असं काय घडतं दोघांमध्ये? पूर्वीचं लग्न नीलशी होतं का हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहावा लागेल. 

दिग्दर्शन

सिनेमाचं कथानक व संवादात सिनेमा उजवा ठरतो. सिनेमाचे संवाद हे या सिनेमाची एक जमेची बाजू म्हणावी लागेल. पूर्वार्धात घटना जितक्या वेगाने घडतात तितक्याच उत्तरार्धात मात्र त्या रेंगाळत जातात. पूर्वाधात दिग्दर्शकाने धक्क्यांवर धक्के देत प्रेक्षकांना चकित करुन टाकत खिळवून ठेवण्यात य़श मिळवलं आहे. पण उत्तरार्ध मात्र बराच रेंगाळत ठेवला आहे. त्यामुळे दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते समजण्यापर्यंत बराच वेळ गेला आहे आणि  त्यामुळे गोष्टीतला गुंता थोडा वाढला आहे. पण प्रत्येक पात्राची निवड व सीन्स मात्र अगदी परिपूर्ण ठरतात व म्हणून या उणीवा झाकल्या जातात. आपण  सिनेमा पाहताना खळखळून हसतोसुध्दा आणि डोळ्यातून टचकन पाणीसुध्दा काढतो. अपेक्षित ऐवजी अनपेक्षित धक्के देण्याचा दिग्दर्शकाने या सिनेमानिमित्ताने केलेला एक निराळा प्रयोग नक्कीच उल्लेखनीय ठरतो. 

प्रत्येक प्रसंगाला साजेसं संगीत हे श्रवणीय ठरतं. उगीचच ओढून ताणून गाणी टाकण्याचा प्रयत्न यात अजिबातच करण्यात आला नाही, हे विशेष.

अभिनय

रिंकू आणि चिन्मयच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा सिनेमा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिंकूच्या अभिनयाचे विविध पैलू जरी सिनेमात जरी उलगडले असले तरी चिनम्यनेही तितक्याच ताकदीचा अभिनय साकारला आहे. त्याच्या सहज हलक्या-फुलक्या अभिनयाने त्याने साकारलेला नील सर्वांनाच आपलासा वाटतो. प्रतिक्षा लोणकर यांनी साकारलेली आई, तेजपाल वाघने साकारलेला मोठा भाऊ या भूमिका लक्षवेधी ठरतात. तर राजन ताम्हाणे, समुखी पेंडसे यांनीसुध्दा  चोख भूमिका बजावल्या आहेत.

सिनेमा का पाहावा ? 

एका मध्यमवर्गीय तरुणीची पण हटके कथा जर तुम्हाला अनुभवायची असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्की पाहा आणि चेरी ऑन द केक म्हणजे रिंकू राजगुरुचे जर तुम्ही खुप मोठे चाहते असाल तर हा सिनेमा तुम्हाला चुकवून चालणार नाही, कारण तिच्या अभिनयाचे विविध पैलू सिनेमात पाहता येतायत. ड्रामा, ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेला एक कम्प्लिट फॅमिली एन्टरटेनर म्हणून हा सिनेमा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive