By  
on  

‘Samantar’ Review : भविष्यकाळाचा वेध घेणारा रहस्यमयी थरार  

आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलय याची कुणालाच कल्पना नसते. मात्र काहिंना हाच भविष्यकाळ जाणून घ्यायचा असतो ज्याने त्यात काही बदल करता येत आहेत का या जाणीवेने तो उत्सुकतेनेन आपलं भविष्य जाणून घेतो. वर्तमानपत्रात येणारे भविष्याचे कॉलम वाचून किंवा मग ज्योतिषाला हात दाखवून. मात्र हाच विषय रहस्यमयी पद्धतिने मांडलाय ‘समांतर’ या कादंबरीत. प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांची ही कादंबरी आहे. आणि याच ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित आहे नुकतीच प्रदर्शित झालेली ‘समांतर’ ही वेब सिरीज. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, नितीश भारद्वाज, जयंत सावरकर, नितीन बोधारे, गणेश रेवाडेकर, बालकलाकार अमृत गायकवाड हे कलाकार या सिरीजमध्ये झळकत आहेत. अर्जून सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांनी या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.


नशीबाला कंटाळलेला कुमार महाजन (स्वप्निल जोशी) ज्याचा पत्नि (तेजस्विनी पंडीत) आणि मुलगा (अमृत गायकवाड) असा छोटासा परिवार आहे. मात्र आयुष्यात घडणाऱ्या विविध घडामोडी आणि आर्थिक परिस्थितीला हा कुमार महाजन सामोरं जातोय. त्यातच त्याच्या कार्यलयातील जवळचा मित्र त्याला एका अचूक भविष्य सांगणाऱ्या कुमार स्वामींकडे (जयंत सावरकर) घेऊन जातो. देवावर, ज्योतिषांवर विश्वास नसणारा कुमार महाजन मित्राच्या आग्रहास्तव या स्वामींकडे जातो खरा परंतू स्वामींनी आपल्याविषयी सांगीतलेली अचूक माहिती ऐकताच त्याचा त्यांच्यावर विश्वास बसतो. मात्र असं असूनही स्वामी काही कुमारचं भविष्य सांगत नाहीत. यावेळी स्वामी अशा एका व्यक्तिचं नाव कुमारसमोर घेतात ज्याविषयी कुमारने कधीचं ऐकलेलं नसतं. सुदर्शन चक्रपाणी असं या व्यक्तिचं नाव. या व्यक्तिच्या आणि कुमारच्या भविष्य रेषा या सारख्या असल्याचं स्वामी सांगतात.  कुमार महाजनचा आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी सुरु असलेला सुदर्शन चक्रपाणीचा शोध. त्याचा शोध घेत असताना त्याच्या समोर येणारे अडथळे या सगळ्याचा रहस्यमयी थरार या वेब सिरीजमध्ये आहे. 


कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वप्निलला मालिका आणि सिनेमांमध्ये एक रोमँटिक हिरो म्हणून आत्तापर्यंत पाहिलयं. मात्र या वेब सिरीजमधून स्वप्निलच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू अनुभवायला मिळतो  या वेब सिरीजमध्ये एक तापट व्यक्ति जो आपल्या नशिबाला कंटाळलेला आहे आणि ज्याच्या तोंडात सतत शिव्या आहेत अशी ही स्वप्निलची व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे ती पाहायला मनोरंजक वाटते. आणि स्वप्निलही त्या भूमिकेत उत्तम शिरलाय. या वेब सिरीजमधील नितीश भारद्वाज यांची एन्ट्री कमाल आणि आश्चर्यकारक आहे. एका सीनमध्ये जेव्हा स्वप्निल आणि नितीश एकत्र दिसतात तेव्हा नितीश भारद्वाज चांगलेच भाव खाऊन गेले आहेत. त्यांचा स्क्रिनवरील वावर अतिशय प्रभावी असल्याचं जाणवतं. मराठी भाषेतील त्यांच्या भारदस्त आवाजातील संवादाने थरारक सीन आणखी खुलले आहेत.  तेजस्विनी पंडीत ही कुमार महाजनची पत्नि म्हणजेच निमा साकारतेय. तिचा स्क्रिनवर फारसा वावर नसला तरी तिच्या सीनमध्ये तिने पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो अतिशय सहज असल्याचं जाणवतं. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांच्या दमदार अभिनयाने स्वामींची भूमिका वेगळ्या उंचीवर जाते. 


रहस्यमयी कथा त्यात ट्विस्टचा थरार आणि उत्तम कलाकारांची फळी असल्याने ही वेब सिरीज पाहणं रंजक ठरते. वेब सिरीजचं संगीत आणि विशेष करून पार्श्वसंगीत जे केल य समीर फतेरफेकर यांनी जे महत्त्वाची धुरा सांभाळण्यात यशस्वी ठरलेत.. रहस्यकथालेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीमधील रहस्याला वेब सिरीजच्या रुपात मांडण्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना यश आलं असून त्यांनी त्याला पुरेपुर न्याय दिलाय. छायांकनाचही इथे विशेष कौतुक जे केलय प्रसाद भेंडे यांनी, ज्याने कथेचा थरार आणखी अंगावर येतो. 


नऊ भागांच्या या सिरीजचा अपूर्ण शेवट आणि रहस्यमयी सुरुवात मात्र दुसरा सिझनही प्रदर्शित होणार असल्याचं खुणावतेय. ही वेब सिरीज मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित झाली आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive