वेब सिरीजचं नाव – आणि काय हवं ? सिझन-2
कलाकार – उमेश कामत, प्रिया बापट
लेखक – वरुण नार्वेकर
दिग्दर्शक – वरुण नार्वेकर
कुढे पाहता येईल - एम एक्स प्लेयर
रेटिंग - 3 मून्स
सध्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून लोकं वेब प्लॅटफॉर्मकडे जास्त वळली आहेत. त्यातच ‘आणी काय हवं’ या वेब सिरीजचं दुसरं सिझनही प्रदर्शित झालं आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यात दिसणारं कपल प्रत्येकाला कुठेतरी त्यांच्या जोडीदाराची आठवण करुन देतं.
वरुण नार्वेकर लिखीत आणि दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे दुसऱ्या पर्वातही हे दोघं आहेत. उमेश आणि प्रिया मुळातच रियल लाईफ कपल असल्याने त्यांना रिल लाईफ कपल म्हणून पाहताना नेहमीच छान वाटतं. तब्बल सात वर्षांनी या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वात दोघं एकत्र दिसले होते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या पर्वातही त्यांची उत्तम केमिस्ट्री अनुभवायला मिळते. या सिरीजमध्ये टिपीकल रोमँटिकपणा न दाखवल्याने या वेब सिरीजमधील जुई आणि साकेत हे कपलं खरंखुरं वाटत. त्यांच्या अभिनयात सहजपणा दिसतो त्यामुळे कुठेनाकुठे प्रत्येक कपलच्या आयुष्यात असं एकदातरी घडलयं असं जाणवतं. या वेब सिरीजमध्ये एकूण सहा भाग आहेत. प्रत्येक भागात एक वेगळी कहाणी पाहायला मिळते. लग्नाला जवळपास 3 वर्षे झालेलं जुई आणि साकेत हे कपल यात मुख्य पात्र आहेत. हसत खेळत सुखी जीवन जगणारा त्यांचा संसार आहे. यात छोट्या छोट्या गोष्टींमधूनही दोघांना मिळणारा आनंद, प्रत्येक आनंद हटके पद्धतिने सेलिब्रेट करणारं हे कपल त्यांची विविध कहाणी पाहायला छान वाटतं. जुई आणि साकेत दोघंही आपलं करियर सुरु असतानाच आयुष्यातला प्रत्येक दिवस अगदी आनंदाने जगतात. भांडणातही गोडवा असणारं या कपलचा हा सहा भागांचा प्रवास प्रत्येक भागत अतिशय रंजक वळणे घेऊन येतो.
एका लग्न झालेल्या कपलची ही गोष्टं आणखी रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी केला आहे. पहिल्या पर्वाच्या तुलनेत दुसऱ्या पर्वाच्या कहाणीत आणखी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि तो यशस्वी ठरलेला आहे. सहा भागांपैकी शेवटचा भाग थोडा ताणल्याचं जाणवतं. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढील भागाची छोटीशी झलक असल्याने आपण लगेचच पुढील भागांकडे वळतो. त्यामुळे कदाचीत एकाच दिवसात सहा एपिसोड पाहून टाकण्याची उत्सुकता लागते.उमेश आणि प्रिया यांच्या मजेशीर संवादाने हे सिरीज आणखी खुलतेय. त्यामुळे साधं सोपं बॅकग्राउंड म्युझिक त्याला योग्य वाटतंय. सिरीजचं जास्तीत जास्त चित्रीकरण हे इनडोअर असल्याने संवाद जास्त आहेत आणि त्यामुळे खरी मजा येते. यात उमेश आणि प्रिया यांच्या सहज सुंदर अभिनयाचं विशेष कौतुक जेणेकरुन कुठेही वरचढ वाटत नाही. सहा भागांपैकी यातील एका भागात अभिनेता प्रियदर्शन जाधव तर एका भागात अभिनेता उद्य सबनीस हे कलाकारही पाहायला मिळतील.
ही वेब सिरीज का पाहावी ? तर सध्या घरात बसून काहीतरी हलकं फुलकं पाहायचं असेल तरी ही वेब सिरीज उत्तम आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. विशेषकरुन तुमच्या जोडीदारासोबत ही वेब सिरीज पाहण्याची खरी मजा आहे हे वेब सिरीज पाहताना नक्की जाणवेल. शेवटच्या भागापर्यंत ही वेब सिरीज तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवेल. धकाधकीच्या जीवनात छोट्या किंवा मोठ्या गोष्टीतला आनंद घ्यायला आपण विसरतो मात्र तो आनंद कसा सेलिब्रेट करायचा हे यात पाहायला मिळतं. आता एवढं सगळं एकाच वेब सिरीजमध्ये पाहायला मिळत असेल तर आणी काय हवंं ?