दिग्दर्शक: महेश मांजरेकर
कलाकार: सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, सचिन खेडेकर, सतीश आळेकर, सक्षम कुलकर्णी
वेळ: 2 तास
रेटींग : 3 मून
ज्यांच्या लेखनाचा मनमुराद आनंद देत क्षर्णाधातच चेह-यवर हास्याची लाट उमटवणारं अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल देशपांडे. त्यांच्या साहित्याने आपल्याला समृध्द केलं. व्यक्तिचित्र, कथा या किती खुसखुशीत असतात आणि त्या किती आपल्याशा वाटू लागतात हे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी शिकवलं. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी लिलया पेललं आहे. ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा पूर्वार्ध नुकताच प्रदर्शित झाला.
कथानक ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या सिनेमात पु. ल देशपांडे यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा वेध घेण्यात आला आहे. या पु.लंच्या बालपणापासूनचा प्रवास अनुभवायला मिळतो. तसंच महत्तवाचं म्हणजे पु.लं आणि सुनिताबाई या दोन टोकांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा मिलाप आणि त्यांचा फुलणारा संसार पाहायला मिळतो. हा जीवनपट असल्याने फक्त एक मूळ कथानक नाही. या सिनेमात विविध प्रसंगातून पु.लंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व रंजक घडामोडी रेखाटण्यात आल्या आहेत.
दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी पु. ल या अफाट व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यातील चढ-उतारांचे बारकावे पडद्यावर मांडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला आहे.अत्यंत लहान लहान प्रसंगांतून पु.ल उलगडण्याचा प्रयत्न केला आहे
अभिनय पु. लं साकारणारा अभिनेता सागर देशमुखकडून रसिकांना व पु.लंना प्रत्यक्षात अनुभवणा-यांकडून ब-याच अपेक्षा होत्या आणि त्यात पूर्ण करण्याचा सागरने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर सुनिताबाईंची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री इरावती हर्षे यांची सिनेमातील अभिनयाची दाद द्यायलाच हवी. तर या दोघांच्या अवतीभोवतीची पात्र साकारणा-या कलाकारांनीसुध्दा आपापला अभिनय चोख बजावला आहे.
सिनेमा का पाहावा? पु. ल अनुभवण्यासाठी आणि आजच्या पिढीला या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देण्यासाठी ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहायलाच हवा.