Movie Review 'ठाकरे': सिनेमागृहात घुमतेय वाघाची डरकाळी

By  
on  

दिग्दर्शक:  अभिजीत पानसे

कलाकार: नवाजुद्दीन सिध्दीकी, अमृता राव

वेळ: 2 तास

रेटींग : 3.5  मून

हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आणि तमाम शिवसैनिकांचं प्रेरणास्थान. या महाराष्ट्राच्या वाघाची डरकाळी आता सिनेमागृहात घुमतेय. मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणा-या बाळासाहेबांच्या आयुष्याचा वेध सिनेमाच्या पडद्यावर काही तासांमध्ये रेखाटणं हे तसं आव्हानात्मकच. पण तो रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी केला आहे. आता हा बाळासाहेबांचा जीवनपट आहे, म्हणून त्यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिधद्कीला मिळालीय हे समजल्यावर प्रथम सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण नंतर बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेतील त्याचं रुप पाहून सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का बसला. तर  मॉंसाहेब मीनाताई ठाकरेंची भूमिका अभिनेत्री अमृता राव साकारतेय. बाळासाहेबांवर सिनेमा असल्याने सिनेसृष्टीसह सर्व राजकीय पक्षातसुध्दा कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.  

कथानक बाबरी मशीदचा खटल्याप्रकरणी बाळासाहेबांची कोर्टात सुरु असलेली चौकशीने सिनेमाची सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर सिनेमाचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये जात बाळ ठाकरेपासून त्यांचा बाळासाहेब ठाकरे होण्यापर्यंतचा प्रवास उलगडत जातो. बाळासाहेब फ्री प्रेसची नोकरी सोडून मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याचं व्रत हाती घेतात. मग इथूनच मार्मिक साप्ताहिक सुरु झाल्यानंतर हळूहळू त्यांच्या मराठी माणसाच्या हितासाठीच्या घडामोडींना वेग येतो आणि वडील प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गदर्शनाने आणि आशिर्वादाने बाळासाहेब शिवसेनेची स्थापना करतात आणि इथूनच सुरु होतो या महाराष्ट्राच्या वाघाचा थरारक प्रवास.  

दिग्दर्शन बाळासाहेब या व्यक्तिमत्त्वाचा दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी सूक्ष्म अभ्यास केल्याचं पडद्यावर सिनेमा पाहता पाहताच लक्षात येतं. अनेक बारकावे त्यांनी सिनेमात टिपले आहेत. तीन तासांमध्ये शिवसेनेचा प्रवासातील महत्त्वाचे टप्पे दाखवण्याचा उत्तम प्रयत्न करुन हा बायोपिक दमदार बनवण्याचं शिवधनुष्यचं पेललं आहे. बाबरी मशीद प्रकरण,कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या, मोरारजी देसाईंच्या मुंबई दौऱ्याला विरोध, मुस्लीम लीगशी युती, मुंबईतील दंगल आणि मराठी व महाराष्ट्राच्या हितासाठी सतत खळळ् खट्ट्याकची भाषा, इंदिरा गांधीसोबतची भेट या संवेदनशील आणि महत्त्वाच्या घटनांचे प्रसंग सिनेमा जिवंत करतात. व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे सिनेमातील शाब्दिक फटकारे म्हणजेच संवांद जबरदस्त आणि प्रभावी ठरतात.

पण यात बाळासाहेबांच्या आयुष्याती काही महत्त्वाच्या व्यक्तींवर प्रकाझोत टाकणं जाणिवपूर्व टाळलं आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिवसेनेचे या सिनेमाचा प्रत्यक्ष भाग नाहीत, हे रुचत नाही. तर  काही दृश्य जबरदस्त झाली आहेत, त्यापैकी दोघांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. एक म्हणजे मुस्लीम इसमाचं बाळासाहेबांसमोर मातोश्रीवरच नमाज पडणे आणि दुसरं म्हणजे बाळासाहेबांच्या हाती आलेलं सत्तेचं रिमोट कंट्रोल या दोन्ही गोष्टी पडद्यावर सुरेख चित्रीत झाल्या आहेत. दरम्यान काही महत्त्वाचे क्रिकेट आणि सिनेमाचे संदर्भही घेण्यात आले आहे. तसंच राजभवन, शिवसेनाभवन, त्या काळची मुंबई हे सिनेमात पाहणं एक पर्वणी ठरतं.

अभिनय बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेत नवाजुद्दीन अगदी चपखल बसला आहे. त्याने त्यांचे हावभाव आणि उभं राहण्याची शैली व इतर बारीकसारीक लकबी अचूक पकडल्या आहेत. आपल्या पतीला प्रत्येक प्रसंगात साथ देणारी कणखर स्त्री उभी करण्याचा प्रयत्न अमता रावने केल आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाची पात्रं सिनेमाभर झळकत राहतात. प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, अनंत गीते, शरद पवार, वसंत नाईक इत्यादी राजकारण्यांची छोटी छोटी झलक पाहायला मिळते.  

सिनेमा का पाहावा? बाळासाहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यासोबतच त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवास अनुभवण्यासाठी आणि आजच्या पिढीला बाळासाहेबांचा झंझावात समजावण्यासाठी हा सिनेमा नक्कीच संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा लागेल. समाजकारण आणि राजकारण यांची  सांगड आणि शिवसेनेच्या इतिहासात डोकावून पाहायचं असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे.  

Recommended

Share