'आई माझी काळुबाई' ही मालिका सुरु झाल्यापासूनच या मालिकेसंदर्भातील विविध वाद आणि चर्चा सुरु आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेत आर्या ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र प्राजक्ताची वागणुक व्यवस्थित नसल्याचं सांगत निर्मात्या अलका कुबल यांच्या निर्णयानुसार तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलं. मात्र या मालिकेतून स्वत:त बाहेर पडल्याचं प्राजक्ता म्हटली होती. त्यानंतर या सगळ्याचा मोठा वाद झाला आणि सोशल मिडीयावरही चर्चा झाली. त्यानंतर अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसली आणि तिने प्राजक्ताला रिप्लेस केलं.
मात्र आता पुन्हा एकदा या मालिकेत मोठा बदल होत आहे. आणि पुन्हा एकदा आर्या बदलणार आहे. आर्याच्या भूमिकेत आता नवा चेहरा समोर येणार आहे. हा चेहरा मालिका विश्वातील परिचीत चेहरा आहे. अभिनेत्री रश्मी अनपट आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.
'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या शुटिंग शेड्युलमुळे वीणा आजारी पडत होती. त्यामुळे वीणाने ही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. आणि आता वीणाच्या जागी रश्मी अनपट ही भूमिका साकारत आहे. तेव्हा पुन्हा एकदा या मालिकेतील आर्याच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट झालय.
एका भूमिकेसाठी सतत अभिनेत्री बदलणं ही गोष्ट खटकत असली तरी आता रश्मी या भूमिकेतून कशी प्रेक्षकांची पसंती मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रश्मीने आत्तापर्यंत विविध नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. पुढचं पाऊल, फ्रेशर्स, अग्निहोत्र 2 या आणि इतर मालिकांमध्ये रश्मी झळकली आहे.