'माझा होशील ना' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्यातही या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या मालिकेत एकीकडे सई - आदित्यचं लग्न झाल्यानंतर आता त्यांचं हनीमूनही दाखवण्यात आलं. यातच मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
सई - आदित्यच्या लग्नात अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुयशने केला. मात्र त्यावर मात करून अखेर दोघं लग्नबंधनात अडकले. मात्र एक नवं संकट आता त्यांच्या समोर येऊन ठेपलय. कारण आता नव्या खलनायकाची एन्ट्री या मालिकेत होत आहे. हा खलनायक आहे जे डी. जेडी म्हणजेच जयवंत देसाई. आदित्य कश्यपच्या आई, वडिलांचा हा मारेकरी असून तो आदित्यचा सख्खा काका आहे. अनेक वर्षांन तो मुंबईत परतणारा आहे. आदित्य ग्रुपची मालकी मिळवणं आणि ज्या ब्रह्मे कुटुंबामुळे संपत्ती आणि कंपनीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता, त्यांना भावांना देशोधडीला लावणं हे उद्दिष्टं घेऊन जेडी परतला आहे. हाच जेडी सई - आदित्य आणि त्याच्या मामांच्या आयुष्यात संकट बनून येणार आहे.
मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील एक उत्तम अभिनेता अतुल परचुरे ही भूमिका साकारत आहेत. या निमित्ताने अतुल पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात दिसतील. या जेडीच्या आगमनाने आता आदित्यच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळ ब्रह्मे कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. तेव्हा सई - आदित्य आणि मामा या संकटाला कसे सामोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.