सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजनात खंड पडू नये आणि घरात बसलेल्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहता यावे यासाठी झी मराठी वाहिनीने देखील अविरत मनोरंजनाचा वसा घेतला आहे. प्रेक्षकांसोबतचे हे ऋणानुबंध जपत, ह्या कठीण काळात सुद्धा मनोरंजन करण्याचं वचन ‘झी मराठी’ आपल्या प्रेक्षकांना देत आहे.
देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. यातच महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असून नवी नियमावली देखील जाहिर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आले आहेत. म्हणूनच काही मराठी वाहिन्यांनी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्णय घेतला असून यापैकी काही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मालिकांचे नवे भाग सुरु राहणार आहेत.
झी मराठीवरील मालिकांच्या चित्रीकरणासाठी बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण, जयपूर या ठिकाणांची निवड करण्यात आली आहेत. यात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं चित्रीकरण मात्र घरातूनच करण्यात येणार आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेचं चित्रीकरण गोव्यात होणार असून या मालिकेची टीम गोव्याला रवाना झाली आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचं चित्रीकरण दमण येथे होणार आहे. 'अग्गबाई सुनबाई' या मालिकेचं चित्रीकरणही गोव्यातच करण्यात येईल. 'माझा होशील ना' या मालिकेचं चित्रीकरण सिल्वासा येथे करण्यात येणार आहे. तर प्रेक्षकांचा आवडता विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'चं चित्रीकरण जयपुर येथे होणार आहे. 'देवमाणूस' या मालिकेचं चित्रीकरण बेळगाव येथे करण्यात येईल.
तेव्हा या मालिकांचे कलाकार आणि टीम त्या त्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत. यात काही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. तर काही मालिकांचे लवकरच नव्या ठिकाणी, नव्या सेट्सवर चित्रीकरणाला सुरुवात होऊन या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार आहेत.