देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळतेय. यासोबतच महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने महाराष्ट्रात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आलय. मात्र या काळातही मनोरंजनात खंड पडू नये आणि प्रेक्षकांना घरबसल्या मालिका पाहता याव्या यासाठी बहुतांश मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले आहेत. अनेक मालिकांची टीम ही महाराष्ट्राबाहेरील गोवा, बेळगाव, सिल्वासा, गुजरात या आणि इतर ठिकाणी पोहोचली आहे. तर काही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवातही झाली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील बहुतांश मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली आहे. या मालिकांचे कलाकाराही त्या त्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. म्हणूनच आता या प्रसिद्ध मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपासून काही मालिकांचे जुने भाग पाहायला मिळत होते. मात्र या नव्या भागांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. स्टार प्रवाहने नुकतेच काही प्रोमो जाहीर करत याविषयीची माहिती दिली आहे.
यात 26 एप्रिलपासून 'रंग माझा वेगळा' या मालिकेचे नवे भाग पाहायला मिळतील. दीपाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या सिक्वेन्सनंतर काय होतं याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. तेव्हा येत्या नव्या भागांमध्ये ते पाहायला मिळणार आहे. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका 'स्वाभिमान' येत्या 27 एप्रिलपासून नव्या भागांसह भेटीला येत आहे. तर 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेचे नवे भाग हे देखील 27 एप्रिलपासून पाहायला मिळतील. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका देखील 27 एप्रिलपासून नवे भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेव्हा 26 एप्रिल आणि 27 एप्रिलपासून या मालिकांचे आता नवे भाग पाहणं रंजक ठरणार आहे.