प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे, ती घराला घरपण देते. तरीही अनेकदा तिच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं, तिला डावललं जातं. तिच्या मतांचा आणि भावनांचा फारसा विचार केला जात नाही. अनेकदा सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल. अशीच एका कुटुंबातील स्त्रीची कहाणी नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बायको अशी हव्वी’ असं या मालिकेचं नाव असून येत्या 17 मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांनी केलं आहे.
आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडतं? विभास आणि जान्हवीचं लग्न कोणत्या परिस्थितीत होतं ? यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ? संसाराबद्दल या दोघांचीही मतं वेगळी आहेत. त्यांची मनं जुळतील का ? हा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेता विकास पाटील या मालिकेत विभासच्या भूमिकेत आहे तर ्अभिनेत्री गौरी देशपांडे जान्हवीच्या भूमिकेत आहे.
मालिकेबद्दल बोलताना मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे प्रमुख दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील मालिका आम्ही रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत... या मालिकांना भरभरून प्रेम देखील मिळत आहे... त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका. आपल्याकडे अनेक वर्षांपासून लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे, कुटुंबाचा सांभाळ तुलाच करायचा आहे असं मुलींना सांगितल जातं. खरंतर संसार दोघांचा असतो. पण अपेक्षा मात्र फक्त मुलीकडून असतात... या सगळ्यामध्ये मुलीला गृहित धरलं जातं, पुरुषांनी आखून दिलेल्या कुंपणात तिला जगावं लागतं... जुन्या विचारांचं कुंपण तोडून, खर्या अर्थाने जोडीदारासोबत संसाराचं नवं चित्र उभ्या करू पाहणार्या एका मनस्वी नायिकेची कथा म्हणजे आमची नवी मालिका “बायको अशी हव्वी”. स्त्री -पुरुष हे कुटुंब व्यवस्थेतेतले अत्यंत परस्परपूरक घटक... प्रत्येक व्यक्तीला त्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे असलेच पाहिजे. स्त्री बायको असो, बहीण असो, आई असो तिला तिचा मान मिळायलाच हवा... या मालिकेमुळे स्त्रियांचा स्वत:बद्दल आणि पुरुषांची स्त्रियांबद्दल विचार करण्याच्या दृष्टीकोनात बदलाची प्रक्रिया सुरु करायचा नव्याने प्रयत्न करेल”
मालिकेचे लेखक - दिग्दर्शक विरेन प्रधान सांगतात की, “शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो, तसंच आधुनिकतेचा, संमजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्य पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा जुनाट दृष्टिकोन आजही तसाच आहे हे जाणवतं…लग्न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्हणजे स्वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी आणि ते तिचं मुख्य ध्येय असावं हे पाहिलं जातं.. हे ध्येय नवरा आणि बायको दोघे मिळून निभावू शकतात याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अजूनही बाईची कर्तव्य आणि पुरुषाची कर्तव्य अशी लेबलं लावूनच बायकांकडे पाहिलं जातं.. या मुखवटयाचं.. मुखवटयांआड घुसमटणा-या स्त्रियांची, आणि ते मुखवटे फाडून नवं, ख-या सहजीवनाचं चित्र उभं करणा-या नायिकेची ही गोष्ट आहे”.