माहेर सोडून जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा वेगळ्या कुटुंबात ती प्रवेश करत असते. ज्या घरात तिला आता आयुष्यभर राहायचय. अशात पतीची साथ असली तरी एक बाई म्हणून मैत्रिणीसारखी सोबतीची गरज असते. अशात जर सासूच मैत्रीण बनली तर ? अशीच कहाणी आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेची.
कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. याशिवाय मालिकेतील ओम - स्वीटूची जोडीही लोकप्रिय ठरली. मालिकेतील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी ह्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलीय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसतय. यातच या आता या मालिकेत वेगळं वळण पाहायला मिळणार आहे.
या मालिकेचा पुढचा टप्पा म्हणजेच 'तू मी आणि पुरणपोळी' हे 16 मे रोजी चित्रपट रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता हे 'तू मी आणि पुरणपोळी' म्हणजे नक्की काय असणार हे 16 मे रोजी कळेलच. तेव्हा थोडी उत्सुकता ताणून ठेवून या चित्रपटरुपातील ओम - स्वीटूची कहाणी पाहणं रंजक ठरणार आहे.