सध्या कोरोनाग्रस्त स्थितीमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. म्हणूनच सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद असल्याने महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण होत आहे. अनेक मराठी मालिकांचेही चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. यात लोकप्रिय मालिका 'आई कुठे करते'चं चित्रीकरण सध्या सिल्वासा येथे होत आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी या मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेचे कलाकार चित्रीकरण संपल्यानंतर किंवा ब्रेकच्या वेळेत शूटींग लोकेशनच्या ठिकाणी निवांत वेळही घालवताना दिसत आहेत. यातच या मालिकेच्या सेटवर एक खास पाहुणा आला आहे. या पाहुण्याने सेटवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अचानक कुठूनतरी एक लॅबरोडॉर श्वानाने या सेटवर हजेरी लावली आहे. त्याला पाहुन या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी लगेचच त्याला जवळ बोलावुन घेतलं. त्याच्यासोबत काही वेळही घालवला. या खास क्षणाचा अनुभव त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केला आहे.
याविषयी ते सांगतात की, "देवाने श्वानची निर्मिती प्रेम देण्यासाठी केली, तेही बिनशर्त" पुढे ते लिहीतात की, "या काळात जे कुणी तणावात, दबावाखाली किंवा आजारी आहेत त्यांनी ज्या परिवाराकडे किंवा मित्रमंडळींकडे पाळीव प्राणी आहेत त्यांच्याकडे नक्की जा. विशेषकरून श्वान (कुत्रा). काही वेळ त्या पाळीव प्राण्यांसोबत घालवा. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला कोणत्याही डॉक्टराची गरज भासणार नाही. मुख्य म्हणजे श्वान हे लगेच तुमचे मित्र बनता आणि ते तुमच्याकडून पैसेही घेत नाहीत. श्वानांच्या दुनियेत प्रेमाचं चलन वापरलं जातं."
मिलिंद गवळी यांनी अचानक आलेल्या पाहुण्यासोबत घालवलेला निवांत वेळ त्यांच्यासाठी खास ठरलेला पाहायला मिळतोय.