येत्या रविवारी म्हणजेच 23 मे रोजी प्रेक्षकांचा दिवस मनोरंजक होणार आहे. या दिवशी प्रेक्षकांची आवडती लोकप्रिय मालिका माझा होशील ना चा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. हा भाग तब्बल दोन तासांचा असणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राईज ठरेल.
ब्रह्मे कुटुंबाला आता गुलप्रितच्या रुपात नवी सूनबाईही मिळाली आहे. मात्र या सगळ्यात सई - आदित्यला एकमेकांसाठी वेळ काढता आला नाही. म्हणूनच आता सई - आदित्य स्वत:साठी वेळ काढणार आहेत. त्यांनी आता सिनेमाला जायचा प्लॅन केला आहे. आदित्यने सईसाठी हा खास सिनेमाचा सरप्राईज प्लॅन केलाय. तेव्हा सई - आदित्य मिळून एका आटपाट नगरीच्या निरागस राजकुमाराची आणि बिनधास्त राजकुमारीची गोष्ट पाहणार आहेत. आजवर न झालेले खुलासे आता या सिनेमाच्या निमित्ताने होणार आहेत. तेव्हा येत्या रविवारी या दोन तासांच्या खास भागातून प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन होणार एवढं नक्की.
'माझा होशील ना' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. मालिकेच्या शीर्षक गीतापासून ते सई-आदित्यची जोडीही चर्चेत राहिली. दोघांचं लग्न कधी होणार याविषयीच्या चर्चाही सोशल मिडीयावर होत्या. मात्र आता दोघांचं लग्न झाल्यावर त्यांच्या आयुष्यात काय अडथळे येत आहेत, सई - आदित्यचा रोमान्स कसा फुलत जातोय हे पाहायला मिळतय.