'रंग माझा वेगळा' या मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेचा वेगळा विषय आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरत आहेत. सध्या मालिका वेगळ्या वळणावर आहे. डॉक्टर कार्तिक आणि दीपाचं प्रेमाचं नातं तर दुसरीकडे दीपाच्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या इनामदार अशी कहाणी सुरुवातीला पाहायला मिळाली. मात्र आता या मालिकेतलं चित्र बदललय. सौंदर्याला आता दीपाविषयी आपुलकी निर्माण झालीय तर याउलट कार्तिकच दीपाचा द्वेष करु लागलाय. या सगळ्यात प्रेग्नेंट दीपा घरापासून, कुटुंबापासून दूर जाऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेय.
या मालिकेत सध्या विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यातच ही मालिका आता 400 भागांचा पल्ला गाठतेय. लवकरच या मालिकेचे 400 भाग पूर्ण होणार आहेत. आत्तापर्यंत विविध भागांमधून या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. तेव्हा इतके भाग पूर्ण केल्यानंतर याचं खास सेलिब्रेशन म्हणून हे कलाकार लाईव्ह येऊन सोशल मिडीयावर प्रेक्षकांसोबत, चाहत्यांसोबत संवाद साधणार आहेत. शिवाय सेटवरही सेलिब्रेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज म्हणजेच 1 जून रोजी 'रंग माझा वेगळा' मालिकेचा 400 वा एपिसोड सादर होत आहे.
'स्टार प्रवाह' वाहिनीने नुकतच सोशल मिडीयावर खास पोस्ट करून या 400व्या भागाविषयी माहिती दिली आहे. "आपण या 400 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!"