माझा होशील ना ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरलीय. या मालिकेतील सई-आदित्यची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलीय. मालिकेत सध्या विविध वळणं पाहायला मिळत आहेत. यातच कलाकार मात्र सेटवर मिळालेल्या निवांत वेळेत मस्ती करताना दिसत आहेत. शूटींगच्या मधला वेळ घालवण्यासाठी ही कलाकार मंडळी काहीना काही टाईमपास करताना दिसत आहेत.
या मालिकेत आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी सेटवर वेळ घालवण्यासाठी सध्या काहीतरी वेगळीच करामत करताना दिसतोय. विराजसने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. विराजससोबत गौतमी देशपांडे, स्नेहल शिदम हे कलाकार हातात एखादी वस्तू घेऊन ती अंगाला न लागता फिरवाताना दिसतायत. एवढच काय तर या कलाकारांनी हातात जळती मेणबत्ती घेतली आणि या करामती करु लागले. विराजसने तर दोन्ही हातात जळत्या मेणबत्त्या घेतल्या आणी त्या हाताने गोल फिरवल्या. यावेळी हे कलाकार प्रचंड आनंदी दिसले. तासन तास चित्रीकरण करणाऱ्या या कलाकारांच्या चेहऱ्यावर निवांत वेळेत अशी मस्ती करतानाचा आनंद दिसतोय.
विराजसने शेयर केलेल्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. सेटवर टाईमपास करण्यासाठी ही करामत करण्याची युक्ती नेमकी कुणाला सुचली असेल हे या व्हिडीओत कळत नसलं तरी ही युक्ती विराजसची असणार ही शक्यता नाकारता येत नाही.
'माझा होशील ना' या मालिकेत सई-आदित्यच्या आयुष्यात आणखी कोणत्या गोष्टी घडतील आणि पुढे काय होईल हे मालिकेच्या नव्या भागांमधून समोर येईलच.