कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे मनोरंजन क्षेत्राचं महाराष्ट्रातील काम ठप्प झालं. मालिका आणि इतर कार्यक्रमांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले. काही मालिकांचे रिपीट भाग पाहायला मिळत होते तर काही मालिकांनी या काळात विश्रांती घेतली. मात्र 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे नवे भाग प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी हजर होते. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु राहिलं. या कार्यक्रमाचही चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आलं होतं.
सध्या राज्यात पाच टप्प्यात अनलॉक सुरु आहे. यात महाराष्ट्रात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रात चित्रीकरणाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात होताना दिसतय. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं चित्रीकरण लॉकडाऊनच्या काळात जयपुर येथे सुरु होते. मात्र नव्या नियमावलीनुसार मुंबईत चित्रीकरणाला परवानगी मिळाली असल्याने या कार्यक्रमाचे विनोदवीर मुंबईत चित्रीकरण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
याशिवाय काही कारणांमुळे जयपुरला चित्रीकरणासाठी न गेलेले डॉक्टर निलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे आता नव्या भागांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे हे सगळे विनोदवीर प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
'चला हवा येऊ द्या'च्या आगामी नव्या भागांमध्ये भाऊ राक्षस बनून प्रेक्षकांना हसवणार आहे तर सागर कारंडे साकारणारा पोस्टमन काका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा लॉकडाऊननंतर ही संपूर्ण टीम पुन्हा एकदा एकत्र आलेली पाहायला मिळणार आहे. नव्या भागांची ही प्रेक्षकांसाठी खास पर्वणीच असेल.