'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. कोरोना काळात लॉकडाऊनमध्येही या कार्यक्रमाच्या टेलेकास्टमुळे प्रेक्षक सुखावले होते. हा विनोदी कार्यक्रम, मंचावर परफॉर्म करणारे कलाकार, लिखाण, सूत्रसंचालन, लोकप्रिय परिक्षक या सगळ्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी खास ठरलाय. या विनोदी कार्यक्रमामुळे प्रेक्षकांचा आठवडा रंजक आणि मनोरंजक बनतो. मात्र आता या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना आता रविवारची वाट पाहावी लागणार आहे.
आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आठवड्यातील एक दिवस म्हणजेच दर रविवारी पाहायला मिळणार आहे. हा दर रविवारी 2 तासांचा डबल धमाका असेल. येत्या 18 जुलैपासून आता प्रत्येक रविवार हा कॉमेडीचा डबल बार उडणार आहे. कारण आता रविवारची हास्यजत्रा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र आपल्या आवडत्या कार्यक्रमासाठी आता आठवडाभर रविवारची वाट पाहावी लागणार यामुळे प्रेक्षक निराश झाल्याचं सोशल मिडीयावर पाहायला मिळतय.
सोनी मराठीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या पोस्टवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत पुन्हा दररोज हास्यजत्रा दाखवण्याची मागणी केली आहे. आता आठवडाभर सोमवार ते शनिवार 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. मात्र हा कार्यक्रम आता हास्यजत्रेचे दररोजचे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जागा भरुन काढेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.