By  
on  

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर फराह खानचा धमाल डान्स, फराहने केलं विनोदवीरांचं कौतुक

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या मंचावर विविध पाहुणे मंडळी येत असतात. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची या मंचावर हजेरी पाहायला मिळते. प्रसिद्ध दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शक फराह खानने नुकतीच या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. 

 'झी कॉमेडी फॅक्टरी' या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश हे कलाकार या कार्यक्रमात आले होते. या कलाकारांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला. त्यांचं जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्व कलाकारांना हसू अनावर झालं.

फराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आल्या आणि या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं."

फराह खानने तर या विनोदवीरांचं कौतुक केलच शिवाय उपस्थित इतर पाहुण्यांनीही या कार्यक्रमाची मजा लुटली. या कार्यक्रमातील विनोदवीरांसह फराह खानने धमाल डान्सही केलाय. चला हवा येऊ द्या च्या आगामी भागात ही खास धमाल पाहायला मिळणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive