By  
on  

चिपळूणमधील संग्रहालय पुन्हा उभं करता यावं यासाठी 'हास्यजत्रा'ची टीम 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विनोदवीरांच्या रंगलेली हास्याची मैफल प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. म्हणूनच या कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. दर्जेदार कॉमेडी आणि एकापेक्षा एक परफॉर्मन्सनी रंगलेल्या या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रा ही संपूर्ण महाराष्ट्राच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आणि आता हे करोडोंचे आवडते हास्यवीर येणार आहेत कोण होणार करोडपती विशेष भागात. आपले समाजाप्रती कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम कोण होणार करोडपतीच्या मंचावर उपस्थित होती. यावेळी सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणसाठी खेळणार आहेत. 

जुलै महिन्यात पावसामुळे अनेक भागात पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यात महाभयंकर पुरानं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर उद्ध्वस्त झालं. हे संग्रहालय आणि ग्रंथालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हे विनोदवीर हा खेळ खेळणार आहे. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात हजारो पुस्तकं, अश्मयुगीन हत्यारे, शिवकालीन ढाल तलवारी,सातवाहन काळातील नाणी, वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज, मूर्ती, नाणी, भांडी, दिवे, जन्मपत्रिका, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या अशा सर्व गोष्टींचा संग्रह केलेला आहे. संपूर्ण कोंकणात असलेलं हे पहिलच ऐश्वर्यसंपन्न असं संग्रहालय आहे.  


चिपळूणमधील 156 वर्षांचा हा वाचन इतिहास पुन्हा उभा करण्यासाठी अशोक नायगावकर आणि इतर सर्वजण आपल्यापरीने मदत करत आहेत.  दर शनिवारी कोण होणार करोडपती  कर्मवीर विशेष भाग होतो. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात.  या शनिवारी कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर बसून हा खेळणार आहेत. यावेळी मंचावर प्रसाद आणि समीर चौगुले यांनी त्यांच्याबरोबर घडलेले काही विनोदी किस्से सांगितले तर समीर-विशाखा यांनी जाऊया गप्पांच्या गावाचं छान सादरीकरण देखील केलं. यावेळी सचिन खेडेकर यांना देखील हसू अनावर झालं आणि त्यांनी या हास्यथेरपीचा मनमुराद आनंद लुटला. हास्यजत्राचे कलाकार या मंचावर येताच कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.  

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांना मदतीचा हात म्हणून हास्यकलाकार कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले. इथे त्यांनी जिंकलेली रक्कम ही लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण याच्या पुनरुभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी हा खास भाग सोनी मराठीवर दाखवण्यात येईल.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive