'जय भवानी जय शिवाजी' या सध्या प्रसारित होत असलेल्या मालिकेची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होती. आता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनही लक्षवेधी ठरतेय. या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळणार आहे. अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकतोय.
अभिनेता विशाल निकम हा या मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका मालिकेत दिसण्याआधीच विशालने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शिवा काशिदच्या भूमिकेचा मालिकेतील प्रोमो सध्या प्रचंड चर्चेत आहे. विशालचा या प्रोमोतील संवाद चांगलाच चर्चेत आलाय. या मालिकेच्या निमित्ताने नुकतच पिपींगमून मराठीने विशालसोबत संवाद साधलाय यावेळी विशालने ही भूमिका आणि या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितलाय.
या मालिकेच्या निमित्ताने विशालला विविध अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो आनंदी असल्याचं सागंतो. शिवाय अभिनेता भूषण प्रधानसोबतची जुनी ओळख असल्याचही तो सांगतो. अभिनय क्षेत्रात येण्याआधी विशाल हा जीम ट्रेनर होता. त्यावेळी त्याची भूषणसोबत ओळख झाल्याचं त्याने सांगितलय. तो म्हणतो की, "ज्यांना मी गावी दुसऱ्यांच्या घरी जाऊन टीव्हिमध्ये पाहायचो त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होतो तेव्हा मला या इंडस्ट्रीबद्दल काही माहिती नव्हतं. तेव्हा पहिला कलाकार ज्यांच्यासोबत माझी ओळख झाली होती ते होते भूषण प्रधान सर. सरांनी मला त्यावेळीपासून खूप सहकार्य केलं. आणि आज त्यांच्यासोबत मी उभा आहे. मला खूप अभिमान वाटतोय. त्यांनाही खूप अभिमान वाटतो. मला अशी चांगली लोकं मिळालीत त्यामुळे मजा येईल."