'ह्या छोट्या खोलीत शूट करणं म्हणजे मला धडकी भरली होती..." मधुराणीने सांगितला हा अनुभव

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एक वेगळा प्रवास पाहायला मिळतोय. हा प्रवास आहे अरुंधतीच्या आयुष्यातील नव्या वळणाचा. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेऊन आता ती तिच्या माहेरी परतली आहे. एकीकडे देशमुखांच्या मोठ्या घरात लग्नानंतर इतकी वर्षे वावरलेली अरुंधती आता आई आणि भावासोबत एका छोट्याश्या खोलीत राहतेय. याचे काही भावुक सीन प्रेक्षकांनाही भावुक करताना दिसत आहेत. 

जसं या मालिकेतील कथेत वेगळं वळण मिळालय तसच चित्रीकरणालाही वेगळं वलय प्राप्त झालय. कारण आता अरुंधतीचे तिच्या आईसोबतचे त्या छोटो खोलीतील सीन्स दाखवण्यात येत आहेत. याचविषयी खास पोस्ट अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले ने केलीय. 

सोशल मिडीयावर या सीन्सचे काही फोटो शेयर करत तिने एकंदरीत तिचा या सीन्सच्या चित्रीकरणाचा अनुभव शेयर केला आहे. ती म्हणते की, "आई ची आई....! अरुंधती आता घटस्फोट घेऊन आईकडे राहायला आलीये. तिच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास सुरु झालाय..ह्याच घरात लहानाची मोठी झाली ...सारं बालपण तारुण्य इथे गेलं आणि नंतर लग्न करून भव्य अशा समृद्धी बंगल्यात गेली ...आणि आता वयाच्या आणि आयुष्याच्या विचित्र वळणावर पुन्हा त्या वास्तूत परतलेय... ओंजळीत निव्वळ आठवणी घेऊन..! पुढे काय? हा प्रश्न तिच्या तसाच माझ्याही मनात आहेच...एवढ्या मोठ्या समृद्धी बंगल्यातून थेट ह्या छोट्या खोलीत शूट करणं म्हणजे मला धडकी भरली होती... इतके महत्वाचे सीन इथे कसे होणार स्पेसच नाहीये....असं मनात येत होतं..पण आमचे कमाल दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांनी त्या एव्हढ्याश्या जागेत हे सगळे सिन असे काही डिझाईन केले की आम्ही सगळेच थक्क झालो... आई च्या ह्या घरातले सीन्स इतके सुंदर बनतील अशी कल्पनाच नव्हती केली आम्ही."

या कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी ती लिहीते की,  "मेधाताईंबरोबर आणि केदार शिरसेकर बरोबर काम करणं म्हणजे केवळ धम्माल..! मेधाताईंच्या स्पर्शातच माया आहे..ती पहिल्या सिन पासूनच मला जाणवत आलीये...आणि केदार म्हणजे सुधीरच...दुसरा कुणी तिथे असूच शकत नाही.आता आम्ही कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा त्या जागेच्या प्रेमात पडलोत..."

तेव्हा आईला क्रेंद्रस्थानी ठेवून असलेल्या या मालिकेत सध्या आई आणि तिची आई हे नातं आणि त्यांच्या नात्यातील भावनीक क्षण पाहायला मिळत आहेत.

Recommended

Loading...
Share