By  
on  

या कारणामुळे अभिनेता श्रेयस तळपदेसाठी ऑगस्ट महिना आहे खूप खास

'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे हा मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. तर श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक करतेय. या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झालीय. 

मात्र या मालिकेसोबतच ऑगस्ट महिना हा श्रेयससाठी खास असल्याचं तो सांगतो. याचं कारण त्याने सांगितलय. तो म्हणतो की, "16 वर्षांपूर्वी इक्बाल हा माझा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला जो माझ्या कारकिर्दीत एक माईलस्टोन ठरला आणि मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. काही वर्षांपूर्वी मी प्रोड्युस केलेला पोश्टर बॉईझ देखील याच महिन्यात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून धरला. आता माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका देखील ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हि एक अनोखी प्रेम कथा आहे आणि या मालिकेला देखील चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे."

याशिवाय श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे. मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "मी मायरा सोबत रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला  सेटवर बिझी ठेवते, ती सेट वर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं कि मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे कि मी तिला एक दिवस सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive