देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत लोकांची मनं जिंकली. एक असा डॉक्टर जो त्याच्या गावात देवमाणूस म्हणून प्रचलित असतो मात्र त्याचा खरा क्रुर चेहरा समोर आल्यावर त्याची कशी तारांबळ उडते हे या मालिकेत सध्या पाहायला मिळतय. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता 'ती परत आलीये' ही सस्पेन्स थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. डॉ. अजितकुमार देव याचा मुखवटा अखेरीस आता उतरणार असून त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. डॉक्टर हा देवीसिंग आहे हे आता सगळ्यांना कळणार आहे. हr मालिका आणि देवीसिंगची भूमिका खूप जवळची असल्यामुळे या मालिकेला निरोप देताना मन भरून आलं अशा भावना अभिनेता किरण याने व्यक्त केल्या.
या मालिकेविषयी किरण म्हणतो की, "देवमाणूस या मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. हा कार्यक्रम आणि माझी त्यातील भूमिका ही नेहमीच माझ्या जवळची राहील कारण या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठिंबा मिळवून दिला. हि मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे जे अढळ आहे. सध्या डॉक्टर अजितकुमारच्या भूमिकेला जरी पूर्णविराम लागला असला तरी पुन्हा एकदा वेगळं काहीतरी घेऊन मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होईन. तो पर्यंत प्रेक्षकांनी अजितकुमारवर प्रेम करत राहाव आणि हा विशेष भाग जरूर पाहावा."
येत्या 15 ऑगस्ट रोजी या मालिकेचा 2 तासांचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.