मराठी मालिका विश्वातील मंदार देवस्थळी हे नाव तसं लोकप्रिय आहे. याचं कारण म्हणजे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आजवर अनेक लोकप्रिय मालिकांचं दिग्दर्शन केलय. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्यात. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांसाठी नवी कलाकृती घेऊन येत आहेत.
झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या आगामी मालिकेचं ते दिग्दर्शन करतायत. या मालिकेच्या निमित्ताने ते अल्पविरामानंतर दिग्दर्शकाच्या खूर्चीत पुन्हा एकदा बसले आहेत. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे हे कलाकारा झळकतायत. येत्या 30 ऑगस्टपासून ही मालिका प्रदर्शित होत आहे. या मालिकेचे विविध प्रोमो सध्या प्रदर्शित करण्यात आलेत.
या मालिकेविषयी मंदार देवस्थळी म्हणतात की, "एक वेगळी आणि अतिशय रंजक प्रेमकहाणी आम्ही मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. प्रेक्षकांचे अत्यंत लाडके कलाकार या मालिकेत त्यांना दिसणार आहेत. तसेच एक गोड आणि फ्रेश लव्हस्टोरी त्यांना पाहायला मिळेल जी पाहताना त्या व्यक्तिरेखांसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करु शकतील. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर देखील प्रएक्षक भरभरुन प्रेम करतील अशी मी आशा करतो."
मंदार यांनी आजवर 'वादळवाट', 'अवघाची हा संसार', 'होणार सून मी या घरची', 'फुलपाखरु' यासह अनेक लोकप्रिय मालिकांचं दिग्दर्शन केलय. याशिवाय त्यांनी काही सिनेमांसाठीही दिग्दर्शन केलय. एक उत्तम दिग्दर्शक, निर्माता, लेखक म्हणून त्यांची ओळख आहे.