महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'ज्ञानेश्वर माउली' ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या 27 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे. भगवत गीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.
दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिगपाल या मालिकेचं दिग्दर्शनही करणार आहेत. चिन्मय आणि दिगपाल या द्वयीनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात.
या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या या चरित्रगाथेतून दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे.