'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारही या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करतात. हा कार्यक्रम सगळा ताण विसरून हसायला भाग पाडतो. त्यामुळे हा कार्यक्रम आणि कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. या कार्यक्रमातील कलाकारांवर कायम कौतुकाची थाप पडताना पाहायला मिळते. मात्र यंदा अशा व्यक्तिने या कार्यक्रमातील कलाकारांचं कौतुक केलय ज्याने हे कलाकारा भारावून गेलेत. ही व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून त्या आहेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर.
लतादीदी आवर्जुन हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहतात. म्हणूनच या कार्यक्रमातील आवडत्या कलाकारांचं त्यांनी कौतुक केलय. अभिनेता समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांना लतादीदींनी खास भेटवस्तू पाठवली आहे. एवढच नाही तर या भेटवस्तूच्या कव्हरवर लतादीदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा देखील आहेत.
समीर आणि विशाखा यांनी सोशल मिडीयावर त्याचा फोटो शेयर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. चक्क लतादीदींकडून कौतुक आणि शुभेच्छारुपी भेटवस्तू आल्यानं आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी मिळाल्याची भावना समीर यांनी व्यक्त केली. समीर लिहीतात की, "निसर्ग किती ग्रेट आहे न !शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली...आज ते प्रकर्षाने जाणवलं...आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं..लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहेमी बघतात आणि खूप हसतात....एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे." पुढे त्यांनी हास्यजत्रा टीमचे आभार मानले आहेत.
तर विशाखा लिहीतात की, "काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले...घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एक card होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक " क्षण "आला, जो "सुख "आणि "आनंद "घेऊनच आला ...!
त्यावरच नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात..लता मंगेशकर...! त्या कायम हास्यजत्रा पाहतात, आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली. त्यांनी केलेले हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट. मी ठार झालेय खरंतर... देवा अजून काय हवयं...!"