'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर आजवर अनेक मराठी आणि हिंदी दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली आहे. मात्र नुकतच काही पोलिसांनी या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती. सगळे कलाकार मिळून परफॉर्मन्सचा सराव करत असताना पोलिस अचानक चला हवा येऊ द्याच्या सेटवर पोहोचली.
पोलिस येताच डॉ. निलेश साबळे यांच्याशी बोलताच ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची चौकशी करण्यासाठी आल्याचं निदर्शनास आलं. त्यावळे तिथे उपस्थित भाऊ आणि कुशल लगेचच पोलिसांशी बोलण्यासाठी गेले. 'पांडू' या सिनेमातील भाऊ आणि कुशलने केलेली पोलिसांची केलेली टिंगल एका माजी पोलिस अधिकाऱ्याला खटकली असल्याची तक्रात उपस्थित पोलिस करताना दिसले.
पोलिसांचं म्हणणं ऐकल्यावर भाऊ आणि कुशल यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होता. पांडू या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसताना अशापद्धतिने पोलिस सेटवर का आले असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे दोघंही चित्रपटात कोणत्याही पद्धतिची टिंगल केली नसल्याचं स्पष्टीकरण भाऊ आणि कुशल पोलिसांना देऊ लागले.
काही क्षणातच कॅमेरे देखील सुरु असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. हे पोलिस खरेखुरे नसून भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेसोबत हा प्रँक केला असल्याच निलेश साबळे यांनी सांगितलं. भाऊ आणि कुशलसह इतर कलाकारांनाही याबाबतची कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे सेटवर एकच हशा पिकला.
भाऊ आणि कुशलची मात्र यादरम्यान तारांबळ उडाली होती. हा सगळा प्रकार प्रँक असल्याचं लक्षात येताच त्यांनाही हसू आवरलं नाही.