By  
on  

मालिकांमधील या कलाकारांनी घेतली तंत्रज्ञांच्या परिवाराची भेट

टेलिव्हिजनवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र हे जणू आपल्या परिवाराचा महत्त्वाचा भाग होऊन जातं. प्रेक्षक घरबसल्या मालिकांचा आनंद लुटतात मात्र हे पात्र यातूनच घराघरात पोहोचतात. मात्र या कलाकारांवसोबतच या मालिकांची तंत्रज्ञ टीमही तितकीच महत्त्वाची असते.  स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने संपूर्ण प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. दर्जेदार कार्यक्रमांचा हा डोलारा उभा करण्यात कलाकार आणि दिग्दर्शकांसोबतच तंत्रज्ञांचाही मोलाचा वाटा असतो.  कलाकारांना घरोघरी पोहचवणारी ही मंडळी मात्र पडद्यामागे राहून सूत्र हलवत असतात. याच सदस्यांना स्टार प्रवाहच्या कलाकारांनी दिलं एक खास सरप्राईज. मालिका घडवण्यात दिवसरात्र राबणाऱ्या या तंत्रज्ञांच्या घरी जाऊन काही कलाकारांनी तंत्रज्ञांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

एक दिवस शूटिंगला ब्रेक देत स्टार प्रवाहच्या कलाकारांनी हा दुग्धशर्करा योग जुळवून आणला. दैनंदिन मालिका साकारण्यासाठी कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबरच मोलाचं योगदान देणाऱ्या सेटवरील तंत्रज्ञांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली.

पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा ही म्हण प्रचलित आहेच. मात्र आम्हीही तुमच्या परिवाराचा एक भाग आहोत ही भावनाच सुखावणारी होती. आपल्या परिवाराचं प्रेम नेमकं काय असतं हे त्यादिवशी आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि मुरांबा मालिकेतील कलाकारांनी अनुभवलं. तर तंत्रज्ञांच्या कुटुंबासाठीही आपल्या लाडक्या कलाकारांची ही भेट अविस्मरणीय ठरली. 

मनसोक्त गप्पा तर रंगल्याच मात्र थोरामोठ्यांना नमस्कार करताना जयदीप ही व्यक्तिरेखा साकारणारा मंदार जाधव, गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि मुरांबा मालिकेतील अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर भावूक झाले होते. तर 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजन,अनिरुद्ध आणि 'रंग माझा वेगळा' मालिकेतील सौंदर्या इनामदारही या खास भेटीने भारावून गेल्या होत्या.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive