इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाचं पहिलं वहिलं मराठी पर्व हे लोकप्रिय ठरलय. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आलेत. त्यातूनच आता महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत.
विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
पहिल्यांदाच 'इंडियन आयडल' सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. प्रस्तुत 'इंडियन आयडल मराठी' महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं.
तेव्हा लवकरच पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात कोणता स्पर्धक बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 18 ते 20 एप्रिल या दरम्यान हा महाअंतिम सोहळा सोनी मराठीवर रंगणार आहे.