स्टार प्रवाहवर येत्या ५ जुलैपासून सुरु होतोय नवा कॉमेडी रिअॅलिटी शो ‘एक टप्पा आऊट’. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे गुणी अभिनेत्री पर्ण पेठे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचं छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे. पर्णला याआधी आपण सिनेमा आणि प्रायोगिक नाटकांमधून भेटलोय. टेलिव्हिजन करण्याचा तिचा अनुभव आणि ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमाविषयीची रंजक माहिती जाणून घेऊया पर्ण कडूनच...
स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने तुझं छोट्या पडद्यावर पदार्पण होतंय त्याविषयी...
खरंय... या शोच्या निमित्ताने माझं टेलिव्हिजनवर पदार्पण होतंय. बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होतेय. कॉमेडी हा माझा प्रांत नाही, पण या मंचावर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. आमचे तिनही जजेस आणि मेण्टॉर्स विनोद कोळून प्यायले आहेत. त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्पर्धकांची एनर्जीही भन्नाट आहे. ते ज्या मेहनतीने परफॉर्मन्सची तयारी करतात ते कौतुकास्पद आहे. ‘एक टप्पा आऊट’ हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव आहे.
सूत्रसंचालनात काय वेगळेपण पाहायला मिळेल?
खरतर होस्ट म्हणजे स्पर्धक आणि प्रेक्षकांमधला दुवा असतो असं मला वाटतं. त्यामुळे बोलीभाषेत संवाद साधण्याचा मी प्रयत्न करते. आजची तरुण पीढी ज्या भाषेत एकमेकांशी संवाद साधतात अगदी तश्याच पद्धतीने हा संवाद असतो.
लूकबद्दल काय सांगशिल?
नेहा चौधरीने माझा लूक डिझाईन केला आहे. खूपच ग्लॅमरस लूक आहे. दर आठवड्याला लूक्सच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायला मिळत आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांसमोर वेगळ्या अंदाजात यायला मिळणार याचा आनंद आहे.
जॉनी लीवर, निर्मिती सावंत, भरत जाधव जजच्या भूमिकेत आहेत... जजेसविषयी काय सांगशिल?
‘एक टप्पा आऊट’चे तीनही जजेस म्हणजे उत्साहाचा अखंड झरा आहेत. सिनेमा, नाटक आणि टीव्ही याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हे तिघंही जेव्हा सेटवर येतात तेव्हा सेटवरचं वातावरणच बदलून जातं. कर्तुत्वाने ही माणसं कितीही मोठी असली तरी त्यांच्यातला साधेपणा आम्हा सर्वांनाच भावतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक रेशम टिपणीस, अभिजीत चव्हाण, विजय पटवर्धन, आरती सोळंकी या मेण्टॉर्सच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ‘एक टप्पा आऊट’ म्हणजे एक सुखद अनुभव असेल. त्यासाठी न चुकता पाहा ‘एक टप्पा आऊट’ ५ जुलैपासून शुक्रवार ते रविवार रात्री ८ वाजता