‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीचा 'भरत'मिलाप

By  
on  

‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या १२ जुलैच्या एपिसोडमध्ये सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी हजेरी लावणार आहे . या कार्यक्रमात जजची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास सरप्राईज देण्यासाठी अंकुशने या मंचावर हजेरी लावली.

अंकुश आणि भरत जाधवची अगदी जुनी मैत्री आहे. लालबाग-परळमध्ये या दोघांचंही बालपण गेलं. गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या एकांकिकांपासून ते अगदी सिनेमापर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्रच केला. दोघांमधली मैत्री अधिक घट्ट होत गेली. या प्रवासात अनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत. ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अंकुश आला आणि या आठवणींना उजाळा मिळाला. आठवणीतले किस्से सांगताना भरतलाही अश्रु आवरले नाहीत. 'दोस्त असावा तर असा' अंकुशच्या हजेरीने सेटवर जल्लोषाचं वातावरण होतं.

 

भरत जाधव यांचं 'मोरुची मावशी' नाटकही सध्या तुफान गाजतंय. अंकुशने फर्माईश केल्यानंतर भरतने या नाटकातल्या सुप्रसिद्ध 'टांग टिंग टिंगा'वर ताल धरुन एपिसोडची रंगत आणखी वाढवली. ‘एक टप्पा आऊट’च्या स्पर्धकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरला. तेव्हा अंकुश आणि भरतच्या मैत्रीचे असंख्य किस्से अनुभवण्याची संधी  ‘एक टप्पा आऊट’च्या विशेष भागात १२ जुलैला रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share