बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर बिग बॉस मराठीचं आगामी पर्व भेटीला येत आहे. यंदाचं हे तिसरं पर्व असून येत्या 19 सप्टेंबरपासून ‘बिग बॉस मराठी 3’ हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यंदाही प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील. कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झालेत.
बिग बॉस मराठी 3 संदर्भातली पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी महेश मांजरेकर यांनी यंदाच्या सिझनमध्ये काही खास सरप्राईज असल्याचं सांगितलं. शिवाय यंदाचं सिझन आणखी मनोरंजनात्मक करण्याच प्रयत्न असल्याचं सांगितलं.
अनेक जण बिग बॉस हा कार्यक्रम स्क्रिप्टेड किंवा स्क्रिप्टनुसार असल्याचं म्हणतात किंवा याविषयी चर्चा होत असतात याविषयी महेश मांजरेकर म्हणतात की, “तुम्ही शंभर दिवसांत त्या कॅरेक्टसोबत किंवा स्पर्धकासोबत गुंतून जाता. त्यासोबत प्रेक्षकही या कार्यक्रमात गुंतून जातात. त्यामुळे यात स्पर्धक ठरवून गेलेत तर लटकतात. शिवाय माझ्या हातात ही काही नसतं की कोण जिंकणार. मुळात हा शो स्क्रिप्टेड असणं अशक्य आहे. एखादं नाटक करत असताना आपण तालमी करतो मग हा कार्यक्रम तर 24 तास कॅमेरे स्पर्धकांवर असणारा आहे. यात स्क्रिप्ट असती तर किती दिवस पाठ करावं लागलं असतं. त्यामुळे जे काही असतं ते प्रेक्षकांच्या हातात असतं. जे घटत असतं ते स्पर्धकांच्या हातात असतं.”
बिग बॉस मराठी या कार्यक्रमात अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळतात. कुणी रागीट असतं तर कुणी संयमी. विविध विचारांचे आणि स्वभावाचे स्पर्धक यात पाहायला मिळतात. मात्र बिग बॉसच्या घरात नेमकं कोण जाणार असतं याची माहिती महेश मांजरेकरांनाही नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय. ते सांगतात की, “मलाही कुणीही स्पर्धकांची नावं सांगत नाहीत. मला माझी पत्निही विचारते की कोण आहेत स्पर्धक म्हणून पण मलाही माहिती नसतं, मला स्वता आधल्या दिवशी कळतं. मी नावं सुचवत नाही कारण ते माझ्या हातात नाही. एखादं कुणी वाटलं तर मी सांगतो त्यांना पण तो त्यांचाच निर्णय असतो.”